मुख्यमंत्र्यांचा दावा; सिंचन सुविधांसाठी ३६ हजार कोटींचा निधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांत विकासकार्य केले असून, हे सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून न्याय मिळाला असून राज्याच्या वतीने आपण मोदी सरकारचे आभार मानतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी मुंबई भाजप अध्यक्ष आ. आशीष शेलार व प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,महाराष्ट्रात दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने आठ हजार कोटी रुपये इतकी आतापर्यंतची सर्वाधिक मदत केली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा राज्यातील शेतकऱ्यांना फार मोठा लाभ झाला आहे. केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठय़ा संख्येने कोल्ड स्टोरेज आणि फळ प्रक्रिया प्रकल्प मंजूर केले आहेत.

राज्यातील सिंचनाचे अर्धवट पडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्य़ांतील सिंचन सुविधा वाढविण्यासाठी केंद्र सरकारने ३६,००० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात  महामार्गाचे सर्वाधिक काम सुरू झाले आहे. चार हजार किलोमीटर लांबीचे महामार्गाचे काम सुरू झाले असून दहा हजार किलोमीटरच्या कामाची प्रक्रिया चालू आहे.

त्यांनी सांगितले की, अनेक दशके रेंगाळलेले महाराष्ट्राचे रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यास केंद्र सरकारने मदत केली आहे. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि आताचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रचंड निधी मंजूर केला आहे. मुंबईची रेल्वे सेवा सुधारण्यासाठी एकाच अर्थसंकल्पात चाळीस हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले. इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी जागा मिळण्याचा प्रश्न पंधरा वर्षे रेंगाळला होता. पण नरेंद्र मोदी यांनी केवळ तीन दिवसांत जागा मिळवून दिली व तेथे आता काम सुरू आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी केंद्राने सर्व परवानग्या दिल्याचे स्पष्ट केले.