News Flash

आघाडीतील दरी वाढविण्याची खेळी

काँग्रेस -राष्ट्रवादीला झुंजविण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न यशस्वी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहीत छायाचित्र )

काँग्रेस -राष्ट्रवादीला झुंजविण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न यशस्वी

काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ नये, उलट त्यांच्यात दरी वाढावी हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न विधान परिषदेच्या निवडणुकीत यशस्वी झाला आहे. दोन काँग्रेसना झुंजवत ठेवण्यावर भाजपने अधिक भर दिला आहे.

भंडारा-गोंदिया मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील वादाचा भाजपला फायदा झाला. ही जागा जिंकून भाजपने राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात शह दिला. स्थानिक पातळीवर दोन काँग्रेसमध्ये टोकाचे संबंध लक्षात घेता ही जागा कोणत्याही परिस्थितीतजिंकायची हे आडाखे आधीच बांधण्यात आले होते. राष्ट्रवादीचे पटेल आणि काँग्रेसचे गोपाळ अगरवाल हे दोघेही परस्परांना पाडण्याकरिता जोर लावणार हे नक्की होते. राष्ट्रवादीची हवा आहे, असे चित्र निर्माण करण्यात भाजपला यश मिळाले. परिणामी काँग्रेसच्या अगरवाल यांनी काँग्रेसची ६७ दुसऱ्या पसंतीची मते भाजपकडे हस्तांतरित केली. दोन काँग्रेसच्या वादात भाजपचे परिणय फुके हे निवडून आल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

जळगावमध्ये माघार घेतल्याच्या बदल्यात भाजपने गोंदिया-भंडारा मतदारसंघात मदत करावी, अशी राष्ट्रवादीची अपेक्षा होती. पण भाजपने आपल्या उमेदवाराकरिता मतांची बेगमी तर केलीच, पण काँग्रेसची मते मिळतील अशी व्यवस्थाही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात परस्परांचे कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादीला मदत केली असती तर वेगळा संदेश गेला असता. यामुळेच आपला उमेदवार निवडून येईल, अशा पद्धतीने मुख्यमंत्री फडणवीस व भाजपने प्रयत्न केल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

सातारा-सांगली मतदारसंघातही काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चुरशीची लढत होती. तेथे उमेदवार उभा न करता भाजपने दोन काँग्रेसमध्ये वाद वाढविण्यास हातभार लावला. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीने शिवसेना व भाजपला मदत केली. यवतमाळमध्येही काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी शिवसेनेच्या बरोबर राहिली.

  • नांदेड, भंडारा-गोंदिया, यवतमाळ, सातारा-सांगली या मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीत दरी निर्माण झाली. या दोन्ही पक्षांत दरी निर्माण करण्याची खेळी भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल, असे भाजपचे गणित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 2:22 am

Web Title: devendra fadnavis comment on ncp and congress party
Next Stories
1 सागरी सुरक्षा रामभरोसेच!
2 ‘शुल्क न देणाऱ्यांना संरक्षण नाही’
3 राज्यातील सनदी अधिकारी मालामाल
Just Now!
X