मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

रेल्वेतील प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी मुंबईत केलेल्या ‘रेल रोको’ आंदोलनावेळी केवळ धरणे आंदोलन करणाऱ्यांना सहानुभूती दाखवून सोडण्यात येईल. पण दगडफेक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जाहीर केले.

रेल्वेतील प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी नोकरीसाठी मुंबईत रेल रोको आंदोलन केले. आता पोलीस त्याचे चित्रण बघून विद्यार्थ्यांची धरपकड करत आहेत. त्यांना अटक होऊन कारवाई झाल्यास या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होईल. भावनेच्या भरात त्यांनी असे आंदोलन केले हे लक्षात घेऊन राज्य सरकारने या तरुणांवर कारवाई करू नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

त्यावर ज्यांनी केवळ धरणे आंदोलन केले त्यांचा नक्कीच सहानुभूतीने विचार करू व त्यांना सोडून देऊ. पण दगडफेक करणाऱ्यांना सोडल्यास या राज्यात कोणीही कायदा हातात घेऊ शकतो, असा संदेश जाईल. त्यामुळे दगडफेक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.