शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार असून स्मारकासाठी आवश्यक असलेली पर्यावरणविषयक परवानगी अंतिम टप्प्यात आहे. लवकरच पर्यावरणविषयक परवानगी मिळेल आणि लवकरच बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी महापौर बंगल्यात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्य प्रमुख उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुखांच्या आवाहनानुसार खासदार, आमदारांनी दिलेले एक महिन्याचे वेतन आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेले १० लाख रुपये असे मिळून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दोन कोटी रुपये जमा झाले. या दोन कोटी रुपयांचा धनादेश उद्धव ठाकरे यांनी ‘मुख्यमंत्री शेतकरी साहाय्यता निधी’साठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.

शिवसेनाप्रमुखांमुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. बाळासाहेबांनी तळागाळातील लोकांमधील नेतृत्व जागृत करून त्यांना मोठे केले. ही प्रेरणा भविष्यातही मिळत राहावी, अशा दर्जाचे बाळासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक मुंबईत उभे राहायला हवे. राज्य सरकारमध्ये प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. सरकार आणि त्यांचे घटक पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत हीच भावना यातून स्पष्ट होते. हा निधी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच वापरला जाईल, असे सांगितले.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी संकेतस्थळामागील संकल्पना विशद केली. तसेच शिवसेनाप्रमुखांविषयी माहिती, छायाचित्रे, चित्रफिती  संकेतस्थळावर समाविष्ट करण्याची इच्छा असल्यास त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन देसाई यांनी केले.

काय आहे संकेतस्थळावर?

स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळामध्ये व्यंगचित्रकार बाळासाहेब, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब, कलारसिक बाळासाहेब, परखड संपादक बाळासाहेब, जनसामान्यांचे नेते बाळासाहेब, आक्रमक आंदोलन बाळासाहेब, बेधडक वक्ते बाळासाहेब, जनतेचे कैवारी बाळासाहेब अशा वेगवेगळ्या दालनांचा समावेश करण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांवरील पुस्तके, व्यंगचित्रे, भाषणे, छायाचित्रे, चित्रफिती आदींचा त्यात समावेश आहे