केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवरही गाजलेल्या, लातूर युवक काँग्रेस सरचिटणीस आणि राहुल ब्रिगेडच्या पदाधिकारी अ‍ॅड. कल्पना गिरी हत्याकांडाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत(सीबीआय) चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्यानुसार केंद्राने राज्याकडे अहवाल मागितला आहे. फडणवीस यांच्या या ‘लेटरबाँब’मुळे काँग्रेसची मात्र मोठी अडचण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
व्यवसायाने वकील असलेल्या आणि स्थानिक युवक काँग्रेसच्या सरचिटणीस कल्पना गिरी यांची मार्च २०१४ मध्ये हत्या करण्यात आली होती. गिरी यांचा मृतदेह तुळजापूरमधील पाचुंदा तळ्यात आढळून आला होता. त्यांच्यावर अ‍ॅसिड टाकून आणि एक डोळाही फोडून मृतदेह विद्रूप करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. लोकसभा निवडणुकीत खुद्द नरेंद्र मोदी यांनीही या हत्याकांडाची दखल घेत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते. तत्कालिन काँग्रेस सरकारने या प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र चौहान, समीर किल्लारीकर, श्रीरंग ठाकूर, प्रभाकर शेट्टी यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सीआयडीने प्रकरणाचा  तपास करून न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले असून सरकारी वकील उज्ज्वल निकम बाजू मांडत आहेत. मात्र सीआयडीच्या तपासातून काही आरोपी सुटल्याचा संशय गिरी यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता.