‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गैरवापर रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणार

राज्यात जागोजागी निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चामुळे फडणवीस सरकार धास्तावले असून, मराठा आरक्षणासाठी आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा (अ‍ॅट्रॉसिटी) गैरवापर रोखण्यासाठी तातडीने पावले टाकण्याचे सरकारने ठरविले आहे. सध्या निघत असलेले मोर्चे हे मराठा समाजाच्या अनेक वर्षांच्या आक्रोशाचे प्रतििबब असून राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेतली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या या मोर्चे आंदोलनांच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी ज्येष्ठ मंत्री, आमदार, खासदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विस्तृत चर्चा केली. समाजाचा आक्रोश दूर करण्यासाठी विविध स्तरांवर संवाद प्रस्थापित करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. मराठा आरक्षणाचा मुद्दा दीर्घकाळ रखडला आहे. त्याचबरोबर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर मराठा समाजाविरोधात होत असल्याने असंतोष वाढत आहे, असे काही मुद्दे चर्चेत उपस्थित करण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर कायदेशीर पेच आहेत. पण त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारीत तथ्य असल्याचा सूर बैठकीत होता. त्यामुळे त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

भाजपची निवडणुकीची रणनीती

भाजपच्या प्रदेश सुकाणू समितीची बैठक मंगळवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘वर्षां’ निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. मुंबई महापालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने त्यात सविस्तर चर्चा झाली. मराठा समाजाचे मोर्चे व असंतोष कमी कसा करता येईल आणि त्याचे निवडणुकीवर किती परिणाम होतील, याबाबत भाजपची पक्षपातळीवरही रणनीती आखली जाणार आहे. याबाबत या बैठकीत चर्चा झाली.