मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘लोकसत्ता’च्या उपक्रमाला शुभेच्छा; ‘तरुण तेजांकित सन्मानचिन्हा’चे अनावरण

महाराष्ट्रातील युवा पिढी विविध क्षेत्रांत प्रचंड काम करत असून अशा तेजस्वी ताऱ्यांचे काम समाजापुढे आणण्यासाठी त्यांना ‘तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरवण्याचा ‘लोकसत्ता’चा उपक्रम आगळावेगळा आणि कौतुकास्पद असल्याचे उद्गार काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

तरुणांची नवनिर्मिती, त्यांच्याकडून समाजास मिळणाऱ्या ऊर्जेचे भरभरून कौतुक करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘तरुण तेजांकित’ उपक्रम सुरू केला आहे. शनिवार, ३१ मार्च रोजी मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात बारा ‘तरुण तेजांकितां’चा सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्काराच्या सन्मानचिन्हाचे अनावरण सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पुरस्कार सोहळ्यास उद्योगपती बाबा कल्याणी आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू हे खास उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रातील तेजस्वी युवा पिढी ही विविध क्षेत्रांत उत्तम कार्य करीत आहे. कामातून तळपणारे हे तेजस्वी तारे हे ‘लोकसत्ता’च्या तरुण तेजांकित पुरस्कारांच्या निमित्ताने समाजासमोर येतील हे खूप महत्त्वाचे आहे. भारत हा युवांचा देश असून आजची युवापिढी प्रचंड काम करत आहे. युवक आपल्या भन्नाट कल्पना अविरत प्रयत्न करून प्रत्यक्षात आणत आहेत. त्यांचे हे काम समाजापुढे आले नाही तर त्यांच्या कल्पना त्यांच्याजवळच राहतील. या तरुणांनी काय चांगले काम केले हे समाजापुढे आले तर राज्यातील तरुणाई त्यांच्यापासून प्रेरणा घेईल. त्यामुळे ‘लोकसत्ता’चा हा उपक्रम अत्यंत चांगला व महत्त्वाचा आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. या अशा विविध क्षेत्रांत वेगळी वाट चोखाळणाऱ्या तरुण तेजांकितांच्या आधारावरच उभा राहणार आहे, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

‘लोकसत्ता’ बारकाईने प्रत्येक घटनांचा विचार करते, मांडते. त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जे जे उपक्रम हाती घेतले आहेत त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. ‘तरुण तेजांकित’ हाही असाच महत्त्वाचा उपक्रम आहे. समाजात आपल्या बुद्धिमत्तने, गुणवत्तेने कर्तृत्ववान ठरलेल्या तरुणांची नोंद घेऊन त्यांच्या तेजाचे वलय लोकांसमोर आणणे हाच मुळी सामाजिक चळवळीचा भाग आहे, असे आम्हाला वाटते. ‘लोकसत्ता’ची ही विचारधारा कौतुकास्पद आहे, असे आमचे प्रांजळ मत आहे.  – केसरी पाटील, केसरी टूर्स

‘लोकसत्ता’ने आयोजित केलेले उपक्रम हे नेहमीच स्तुत्य असतात. ‘तरूण तेजांकित’ या उपक्रमाद्वारे तरुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. ‘लोकसत्ता’ने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करून फार मोठे पाऊल  उचलले आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात तरुणांमधील कौशल्य ओळखून त्याचा गौरव केल्यास त्यांना निश्चित प्रोत्साहन मिळेल. त्यांच्यामध्ये सतत नाविन्यपूर्ण गोष्टी करत राहण्याचा उत्साह  राहील. ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेला हा पुरस्कार सोहळा कौतुकास्पद असून आम्ही त्याचा भाग असल्याचा आनंद आहे.   – गौतम ठाकूर, अध्यक्ष, सारस्वत बँक

‘लोकसत्ता’चा ‘तरुण तेजांकित’ उपक्रम नवा असला तरी या उपक्रमास मिळालेल्या प्रतिसादामुळे वाचकांचा ‘लोकसत्ता’वरील विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे. पुरस्कारासाठी निवडण्यात आलेली तरूण व्यक्तीमत्त्वे ही पारदर्शक प्रक्रियेद्वारे, योग्य मापदंडांच्या आधारे तोलूनमापूनच निवडण्यात आली आहेत. जनसामान्यांनाही त्याबाबत खात्री आहे. तरुणाईचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम फारच कमी माध्यमे करत आहेत. त्यामुळे ‘लोकसत्ता’ने हाती घेतलेल्या या उपक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो आहोत.   – विजय पवार, संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, मीराडोर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज

कार्यक्रमाचे टायटल पार्टनर

‘केसरी टूर्स’ असून ‘मिराडोर’ आणि ‘सारस्वत बँक’ हे असोसिएट पार्टनर आहेत. पॉवर्ड बाय एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, एम. के. घारे ज्वेलर्स, अनुरूप विवाह संस्था आणि न्युट्रीव्हॅल्यू असून हेल्थ पार्टनर ‘आयुशक्ती’ आहेत. ‘ब्रह्मविद्या’ हे हिलिंग पार्टनर, ‘पीडब्ल्यूसी इंडिया’ हे नॉलेज पार्टनर, ‘एबीपी माझा’ हे टेलिव्हिजन पार्टनर आणि ‘फीव्हर १०४ एफएम’ हे रेडिओ पार्टनर आहेत.