एप्रिल २०२१मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने लस घेतल्याचं प्रकरण बरंच गाजलं होतं. फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस हा तेव्हाच्या वयाच्या अटीमध्ये बसत नसून देखील त्याला लस देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. यावरून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकासआघाडीतल्या तिन्ही पक्षांनी टीका केली होती. मात्र, तन्मय फडणवीस याने आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतल्याची बाब आता समोर आली आहे. बारामतीमधील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मिळवली आहे. तसेच, तन्मय फडणवीसच्या ट्विटर अकाउंटवर त्याने Actor असा प्रोफाईल इन्फो लिहिलेला असताना त्याला आरोग्य कर्मचारी म्हणून लस कशी मिळाली? असा प्रश्न नितीन यादव यांनी उपस्थित केला आहे.

सेव्हन हिल्स रुग्णालयात घेतला होता पहिला डोस

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी यासंदर्भात २१ एप्रिल २०२१ रोजी यासंदर्भातल्या माहितीची मागणी करणारा अर्ज मुंबईतल्या सेव्हन हिल्स रुग्णालयात केला होता. त्यासंदर्भात ४ जून २०२१ रोजी माहती पुरवण्यात आली असून त्यामध्ये यासंदर्भातला खुलासा करण्यात आला आहे. याच सेव्हन हिल्स रुग्णालयात तन्मय फडणवीस याने कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला होता. पहिल्या डोसनंतर मिळालेले प्रमाणपत्र दाखवून नागपूरमध्ये त्याने दुसरा डोस घेतला होता. मात्र, त्याला पहिला डोस कशाच्या आधारावर देण्यात आला? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. त्यावर आता या माहिती अधिकारांतर्गत खुलासा झाला आहे.

tanmay fadnavis rti
नितीन यादव यांच्या आरटीआयला आलेले उत्तर

आरोग्य कर्मचारी असल्याचं बनावट ओळखपत्र?

दरम्यान, यावर बोलताना नितीन यादव यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शुभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस यांनी पहिला डोस मुंबईच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये घेतला होता. त्यांनी दुसरा डोस नागपूरमध्ये घेतला होता. पहिला डोस घेताना त्यांनी आरोग्य सेवक म्हणून नोंद केल्याचं माहिती अधिकारात स्पष्ट झालं आहे. तर ट्विटरवर त्यांनी स्वत:ची ओळख अभिनेता म्हणून दिली आहे. ते फडणवीसांचे पुतणे आहेत म्हणून त्यांना लस दिली, अभिनेते आहेत म्हणून त्यांना लस दिली, आरोग्य सेवक आहेत म्हणून लस दिली की त्यांनी खोटं आरोग्य सेवकाचं प्रमाणपत्र सादर करून लस घेतली?” असे प्रश्न यावर आता नितीन यादव यांनी उपस्थित केले आहेत.

tanmay fadnavis rti reply
नितीन यादव यांच्या आरटीआयला आलेले उत्तर

कागदोपत्री नोंद हेल्थकेअर वर्कर म्हणूनच!

दरम्यान, नितीन यादव यांनी केलेल्या आरटीआय अर्जाला रुग्णालयाकडून लेखी उत्तर आलं आहे. त्यामध्ये “या कार्यालयाच्या अभिलेखानुसार १३ मार्च रोजी सकाळी ४ वाजून १७ मिनिटांनी तन्मय फडणवीस, वय वर्षे २५ यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. अभिलेखानुसार त्यांची वर्गवारी हेल्थकेअर वर्कर अशी दिसून येते. प्रचलित कार्यप्रणालीनुसार तन्मय फडणवीस यांनी कोविन अॅपमध्ये केलेल्या नोंदणीनुसार त्यांनी नोंदणीसाठी नमूद केलेल्या शासकीय ओळखपत्राची खातरजमा करून त्यांचे लसीकरण करण्यात आले आहे”, अशी माहिती देण्यात आली आहे.

“…तर मग तन्मय फडणवीसला लस दिलीच कशी काय गेली?”

यावरून टीका झाल्यानंतर फडणवीस म्हणाले होते…!

केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झालं. मात्र, तन्मय फडणवीसचं वय २५ वर्षे असूनही १३ मार्च रोजी सकाळी त्याला मुंबईत लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात नागपूरमध्ये त्याने लसीचा दुसरा डोस घेतला. लस घेतल्याचा फोटो देखील त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र, यावरून वाद सुरू झाल्यानंतर हा फोटो डिलीट करण्यात आला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यावर प्रतिक्रिया दिली होती. “तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे”, असं ते म्हणाले होते.