मुख्यमंत्र्यांचा आरोप; विधिमंडळात कोणत्याही प्रश्नावर चर्चेची तयारी

आरक्षणासारख्या मुद्यांचा वापर करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून होत असून विरोधकही त्याला खतपाणी घालत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केला. विधिमंडळात विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास सरकार सज्ज आहे. विरोधकांनीही राज्याच्या हिताचे प्रश्न उपस्थित करावेत, चुकीचे आकडे देऊन राज्याला बदनाम करू नका असे आवाहनही त्यांनी केले. दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे ७५०० कोटींचा प्रस्ताव पाठविल्याची माहितीही त्यांनी दिली.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून येथे सुरू होत आहे.  या अधिवेशनात दुष्काळ, आरक्षण, कर्जमाफी अशा सर्वच प्रश्नांची चर्चा होणार असून १३ नवीन विधेयके मांडली जाणार आहेत. राज्यात यंदा दुष्काळाची स्थिती गंभीर असून १५१ तालुके आणि २६८ मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ निवारणासाठी केद्र सरकारला सात हजार ५०० कोटी रुपये मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

‘मुद्देच नसल्याने विरोधकांना चित्रपटाचा आधार’

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानानंतर माध्यमांशी बोलताना सभागृहातच उपस्थित करण्यासाठी कोणतेच मुद्दे नसल्याने विरोधकांना हिन्दी चित्रपटांच्या ‘ठग्ज ऑफ ’सारख्या टायलचा आधार घ्यावा लागत आहे. पण ते आज जे प्रश्न उपस्थित करीत आहे, ते सर्व त्यांच्याच काळात निर्माण झालेले असून दुसऱ्याकडे बोट दाखविताना चार बोटे आपल्याकडे आहेत याचे भान ठेवण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.