विधानसभेतील विरोधकांच्या गैरहजेरीवरून मुख्यमंत्री बरसले

शेतकरी कर्जमाफीवरून विधानसभेत सरकारला घेरण्याची सुवर्णसंधी असतानाही काही आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा करीत विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. विरोधकांच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जोरदार हल्ला चढविला. सभागृहात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सर्वाचा आग्रह असतांना आमचा विरोधी पक्ष मात्र बाहेर फिरतोय, त्यांच्या संघर्ष किती आणि कशासाठी आहे हे सर्वानाच माहित आहे. या संघर्षांचा त्यांना लखलाभ होवो अशा शब्दात यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या संघर्ष यात्रेची खिल्ली उडविली.

राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असतांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधान सभेत गोंधळ घालणाऱ्या दोन्ही काँग्रेसच्या १९ आमदारांना सरकारने ३१ डिसेंबपर्यंत निलंबित केले होते. यांच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजावर गेल्या तीन आठवडय़ांपासून बहिष्कार घातला आहे. त्यामुळे विरोधकांच्या गैरहजेरीतच विधानसभेचे कामकाज असून अनेक विधेयक चर्चेविनाच संमत केली जात आहेत. १९ पैकी ९ सदस्यांचे निलंबन मागे घेत ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न सरकारने केला. मात्र सर्व सदस्यांचे निलंबन मागे घेतल्याशिवाय सभागृहात कामकाज भाग घेणार नसल्याची भूमिका घेत विरोधकांनी सभागृहात न फिरकता विधान भवनाच्या पायऱ्यांवर कर्जमाफीसाठी आंदोलन केले.

सत्ताधारी आणि विरोधकांमधील या वादामुळे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, पद्मविभाषण शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तसेच विधान सभेचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांच्या संसदीय कारकिर्दीला ५५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रस्ताव सातत्याने पुढे ढकलावा लागत आहे.

कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधकांच्या सुरात सूर मिसणाऱ्या शिवसेनेने आज अचानक भाजपाच्या सुरात सूर मिसळत विरोधकांना लक्ष्य केले. इंदिरा गांधी, शरद पवार यांचे या देशासाठी आणि राज्यासाठी मोठे योगदान असून त्यांच्या अभिनंदानाचा ठराव सातत्याने पुढे ढकलून या नेत्यांचा अवमान केला जात आहे. विरोधकांना या नेत्यांविषयी गांभीर्य नाही, त्यामुळे आजच हा प्रस्ताव चर्चेला घ्यावा असा आग्रह शिवसेना- भाजपच्या सदस्यांनी धरला. विरोधक असोत वा नसोत आम्हाला या प्रस्तावावर चर्चा करू द्या असा आग्रहही यावेळी सदस्यांनी धरला.