मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

जलयुक्त शिवार योजनेतून आतापर्यंत राज्यातील पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात आली आहेत. ही योजना अधिक प्रभावीपणे राबवून २०१९ पर्यंत राज्यातील वीस हजार गावे दुष्काळमुक्त करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई येथे दिली. सीवूड्स येथील गणपत शेठ तांडेल प्रदर्शनी मैदानात रविवारी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या सत्संगच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी श्री श्री रविशंकर, नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे, आमदार मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर उपस्थित होते.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न गंभीर आहे. पाण्याची समस्या मोठी असून जलयुक्त शिवार योजनेमध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या माध्यमातून रविशंकर यांच्या अनुयायांनी केलेले कार्य खूप मोलाचे आहे. पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात या अनुयायांचा वाटा मोठा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

जीवनात विचारांची आध्यात्मिक संपदा मोलाची असून, रविशंकर यांचे एकशे चाळीस देशांत विचार प्रवर्तनाचे काम सुरू आहे. रविशंकर यांनी देशाला व जगाला विचार, संस्कार, संस्कृती, सभ्यता शिकवण्याचे काम केले आहे. स्वामी विवेकानंद यांच्याइतकेच मोलाचे काम रविशंकर हे करत आहेत. त्यामुळे ते भारताचे खरे सदिच्छादूत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न गंभीर असून शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती करण्यावर भर दिला पाहिजे, असे रविशंकर यांनी या वेळी सांगितले.