News Flash

“पाठीत खंजीर खुपसला गेला होता, त्यावेळच्या भावनेतून…!” ‘त्या’ शपथविधीवर फडणवीसांचा खुलासा!

अजित पवार यांच्यासोबतच्या शपथविधीसंदर्भात 'लोकसत्ता'च्या 'दृष्टी आणि कोन' या दूरसंवादमालेत देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबतच्या 'त्या' शपथविधीबाबत भूमिका मांडली आहे.

राज्याचे विद्यमान विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली झालेल्या निवडणुकांनंतर अजित पवार यांच्यासोबत भल्या सकाळी केलेला शपथविधी बराच चर्चेत राहिला होता. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या ८० तासांच्या चाललेल्या सरकारची चर्चा अजून देखील होत असते. त्यावर फक्त शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर खुद्द भाजपामधून देखील चर्चा किंवा नाराजी किंवा पाठिंबा अशा संमिश्र भूमिका व्यक्त होत असतात. पण हे ८० तासांचं सरकार स्थापन करताना नेमकी आपली काय भूमिका होती, हे आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केलं आहे. ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित केलेल्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेत देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडली आहे.

तो निर्णय चूकच होता!

भाजपा आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून फाटल्यानंतर पडद्यामागून अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण पाठिंब्यासाठी पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे हे सरकार ४ दिवसांत गडगडलं. पण तो निर्णय चुकीचाच होता, असं फडणवीस म्हणाले आहेत. “राष्ट्रवादीसोबतचं सरकार करायला नको होतं. ती चूक आहे. असं सरकार आम्ही स्थापन करायला नको होतं”, असं फडणवीस म्हणाले. निवडणूक काळातील आघाडीविषयी फडणवीसांनी यावेळी सविस्तर भूमिका मांडली.

‘…तर चांगलं झालं असतं!’

दरम्यान, अजित पवारांसोबत घेतलेल्या शपथविधीमुळे आपल्या प्रतिमेला तडा गेल्याचं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी मान्य केलं. “तो निर्णय चूकच होता. पण त्याचा पश्चात्ताप नाही. कारण ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो, तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. कारण राजकारणात तुम्ही मेलात, तर त्याला उत्तर देता येत नाही. खंजीर खुपसला गेल्याला उत्तर द्यायचं होतं. त्यावेळच्या भावना, राग होता. त्यातून आम्ही ते केलं. पण ही चूक होती. आमच्या समर्थकांनाही ते आवडलं नाही. आमच्या समर्थकांमध्ये जी माझी प्रतिमा होती, त्याला देखील काही प्रमाणात तडा गेला. ते नसतं केलं तर चांगलं झालं असतं”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही – देवेंद्र फडणवीस

फासे नीट पडले नाहीत आणि गेलं सरकार!

महाराष्ट्रात सरकार पडलं, त्यावेळी नेमकं काय घडलं, यावर देखील फडणवीसांनी यावेळी भाष्य केलं आहे. “महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी पहिली मुलाखत देऊन आमचे सर्व पर्याय खुले आहेत असं सांगितलं. तेव्हा आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारणात फार उतरत नाहीत. पण अमित शाह पूर्णवेळ त्या चर्चेत होते. मी इश्वरावर आणि योगावरही विश्वास ठेवतो. कधीतरी योग असा असतो की आपण खूप प्रयत्न करतो. पण फासे नीट पडले नाहीत आणि गेलं सरकार”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

..तेवढंच अनैतिक हे सरकार आहे!

“मी म्हणायचो काँग्रेसचा इतिहास पाहाता काँग्रेस काहीही झालं तरी महाविकासआघाडीमध्ये येणार नाही. पण ते घडलं. माझं राष्ट्रवादीसोबत जाणं जेवढं चूक होतं, तेवढंच अनैतिक हे सरकार आहे”, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2021 6:15 pm

Web Title: devendra fadnavis on oath taking with ajit pawar in drushti ani kon program in drushti ani kon program pmw 88
Next Stories
1 मनसे भाजपा युती होणार का?; फडणवीस म्हणाले, “मनसेने हिंदुत्व…”
2 पालिकेच्या चार नव्या जम्बो करोना रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग!
3 निर्बंध शिथिलीकरणाचा प्रस्ताव
Just Now!
X