मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये झालेल्या बलात्कार घटनेतील पीडितेचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अत्यंत पाशवी अशा या घटनेवर आता सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भा तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. “साकीनाक्यात घडलेला प्रकार आणि त्यानंतर पीडितेचा मृत्यू मन सुन्न करणारा आहे. गेल्या महिन्याभराच्या काळात बलात्काराच्या घटना होत आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच, या घटना मुंबईत असुरक्षिततेची भावना निर्माण करणाऱ्या असल्याचं देखील ते यावेळी म्हणाले.

“साकीनाका, अमरावती, पुण्यातील ३ घटना, पालघर, नागपूर या सगळ्या भयानक अशा घटना आहेत. मुंबईचा लौकिक सुरक्षित शहर म्हणून आपण पाहतो आहे. मुंबईत रात्री महिलांना फिरण्यात कधी अडचण येत नाही. पण अशा घटनांमुळे मुंबईच्या लौकिकाला धक्का पोहोचतो आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते. हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा आणि ही माणसं इतकी पाशवी कशी असू शकतात असा प्रश्न निर्माण करणाऱ्या या घटना आहेत”, असं फडणवीस म्हणाले.

फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी

दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी व्हावी, अशी मागणी केली आहे. “या प्रकरणात सर्व संबंधित आरोपींना अटक करावी, फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण न्यावं आणि त्या माध्यमातून आरोपींना शिक्षा व्हायला हवी. अशा आरोपींना फाशीच व्हायला हवी”, असं फडणवीस म्हणाले.

“सरकारला फुरसतच नाही..”

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सरकारवर टीकास्त्र सोडलं. “शक्ती कायद्यासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. पण आजच्या कायद्यांचा वापर करूनही आपण फास्टट्रॅक कोर्टमध्ये अशा केसेस चालवू शकतो. या प्रकरणात स्वत: मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची भेट घेऊन फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण नेऊन नराधमांना शिक्षा देण्याची विनंती करावी. महिला आयोगाच्या संदर्भात सरकारने अनेकदा आश्वासन दिलं, न्यायालयाने देखील आदेश दिले आहेत. पण सरकारला फुरसतच नाही की ते महिला आयोगाला अध्यक्ष देतील”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

 

Sakinaka Rape Case : “आम्ही भाषणाच्या पलिकडे काही करू शकलो नाही, ही हार आहे आमची”, चित्रा वाघ यांना भावना अनावर!

“..म्हणून पोलीस फोर्स कमजोर होते”

“पोलीस विभागात काय चालू आहे, याचाही विचार करणं गरजेचं आहे. यापूर्वीही अशा घटना घडत होत्या. पण इतक्या वारंवार घटना घडणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. अशा घटना घडूच नयेत, अशी अद्दल घडली पाहिजे. वारंवार घटना घडल्या, की असुरक्षिततेची भावना निर्माण होते. पोलिसांमध्ये देखील काही प्रमाणात नाराजी दिसून येते. बदल्यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. काल-परवा झालेल्या बदल्यांमध्ये आयपीएस अधिकाऱ्यांनी मला बोलून दाखवलं की नियमबाह्य पद्धतीने सगळा व्यवहार सुरू आहे. इथे आम्हाला हवी तीच, आम्हाला सोयीची, आमच्या व्यवहारांना संरक्षण देणारीच माणसं आणू असा व्यवहार झाला, की ही पोलीस फोर्स कमजोर होते आणि गुन्हेगार बेफाम होतात”, अशा शब्दांत फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.