चार-पाच मंत्र्यांना डच्चू व काही फेरबदल?

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच मोठे फेरबदल होणार असून चार-पाच मंत्र्यांना डच्चू देऊन सहा-सात नवीन चेहऱ्यांचा समावेश मंत्रिमंडळात केला जाणार आहे. हा छोटेखानी विस्तार मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष अमित शहा यांची अहमदाबाद येथे झालेल्या भेटीत चर्चा करुन त्यांची संमती घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही त्यांची चर्चा होणार असून हा विस्तार मार्गी लागेल, असे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठरविले असून मंत्र्यांच्या दोन-अडीच वर्षांतील कामगिरीचाही आढावा घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांच्या कामगिरीचा अहवाल तयार केला असून त्याची माहिती शहा यांना दिली आहे. ज्या मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नाही, त्यांना गेल्यावर्षीच त्याबाबत स्पष्ट कल्पना देण्यात आली होती. याबाबत वर्षभराने आढावा घेऊन निर्णय घेण्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. काही मंत्र्यांच्या कामाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस हे नाराज असून त्यांना डच्चू देऊन नवीन नेत्यांना संधी देण्याचा त्यांचा विचार आहे.

सध्या मंत्रिमंडळात ३९ सदस्य असून चार जणांचा समावेश केला जाऊ शकतो. पण एक किंवा दोन जागा रिक्त ठेवून दोन किंवा तीन नेत्यांचाच समावेश केला जाईल. त्याचबरोबर सुमार कामगिरी असलेल्या चार-पाच मंत्र्यांना डच्चू दिल्यास त्यांच्याजागी नवीन चेहऱ्यांना सधी देता येऊ शकते. या निर्णयामुळे पक्षात खळबळ माजणार आहे. पण चांगली कामगिरी केल्याशिवाय जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करता येणार नाहीत, अशी कठोर भूमिका फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींपुढे मांडल्याचे समजते. मंत्र्यांना आपली कामगिरी दाखविण्यासाठी दोन-अडीच वर्षांचा कालावधी पुरेसा आहे. त्यांच्या कामाचा आढावाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही वेळा घेतला आहे. पक्षाने २०१९ च्या निवडणुकांसाठी तयारी सुरु केली असून तोपर्यंत राज्यात चित्र पालटायचे असेल, तर सुमार कामगिरी करणाऱ्यांना हटवून नवीन चेहऱ्यांना आणण्याची तयारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरु केली आहे. त्याचबरोबर काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल करण्यात येतील. शिवसेनेलाही काही खाती बदलून हवी आहेत. त्यामुळे यासंदर्भात फडणवीस यांनी शहा यांच्याशी चर्चा करुन त्याबाबत काही निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान मोदी हे शुक्रवारी विदर्भात येत असून मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्याबरोबर असतील. त्याचबरोबर ओडिसातील भुवनेश्वरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय कार्य समिती, कार्यकारिणी बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस जाणार असून तेथेही त्यांची मोदींशी भेट होणार आहे. यादरम्यान मंत्रिमंडळ फेरबदलासाठी त्यांची संमतीही घेतली जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.