मुख्यमंत्र्यांची माहिती ; ठाण्यातील वाहतूक कोंडीवर ‘रो-रो’चा उतारा

ठाणे-मीरा भाईंदर, कल्याण या शहरांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी ठाणे आणि वसई खाडीत लवकरच प्रवासी जलवाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्याचा प्रकल्प अहवाल करण्याचे कामही सुरू झाले असून केंद्राच्या सागरमाला योजनेतून हा प्रकल्प मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली. मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील प्रवासी वाहतूकही वर्षभरात सुरू होणार असून पश्चिम किनारट्टीवरही नरिमन पॉइंट ते बोरिवली दरम्यानही प्रवासी जलवाहतूक सुरू करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रताप सरनाईक, संजय केळकर, राज पुरोहित, मंदा म्हात्रे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारने राज्यातील १४ मार्ग हे राष्ट्रीय जलवाहतूक मार्ग (नॅशनल वॉटर वे) घोषित केले असून त्यातील सात मार्ग खाडय़ांच्या कक्षेत आहेत. ठाणे खाडीतील जलमार्ग हा ५३ क्रमांकाचा राष्ट्रीय जलमार्ग असून त्याची लांबी १४५ कि.मी. आहे. त्यामध्ये २८० कोटी रुपये खर्चून प्रवासी जलवाहतुकीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येणार असून ठाणे महानगरपालिका याचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करीत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे गोराई, बोरिवली, वसई व भाईंदर दरम्यान रो-रो वाहतूक प्रस्तावित असून त्यास केंद्राची सागरमाला योजनेंतर्गत मान्यता मिळाली आहे. पर्यावरण विभागाच्या परवानगीनंतर या कामाला सुरुवात होणार आहे. नाशिकहून गुजरातकडे जाणाऱ्या ट्रक व अवजड वाहनांची वाहतूक ठाणे शहराबाहेरून वळती करण्यासाठी कशेळी ते घोडबंदर दरम्यान रो रो सेवा सुरू करण्याचे विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले.

  • या प्रकल्पामुळे कल्याण-ठाणे-कोलशेत-गायमुख-भाईंदर-वसई अशी प्रवासी जलवाहतूक करता येईल.
  • त्यासाठी कल्याण, वसई, मीरा भाईंदर, घोडबंदर रोड, भिवंडी, कोलशेत, दिवा, ठाणे येथे जेट्टी बांधून ही जलवाहतूक करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होईल.