शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा समारंभ कोणालाही घाबरून राजभवनावर आयोजित केला नसून आता राज्यभरात बाबासाहेबांचे अनेक सत्कार केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात केली.
सामान्य माणसाच्या मनामनात घर करून राहील अशा शब्दांत घराघरात शिवरायांचे चरित्र पोहोचविणाऱ्या बाबासाहेबांचे कार्य महान आहे, अशा शब्दांत पुरंदरे यांच्या कार्याचा मुख्यमंत्र्यांनी गौरव केला. आपल्या भाषणात फडणवीस यांनी शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्याची उदाहरणे अधोरेखित केली. आजच्या शब्दांत सांगायचे, तर शिवाजी महाराज हे एक ‘मॅनेजमेंट गुरू’ होते, असे सांगून, त्यांच्या पैलूंचे विविधांगी दर्शन घडविणारी चित्रवाणी मालिका, चित्रपट तयार करण्याची कोणाची तयारी असेल, तर राज्य सरकार त्यासाठी सर्वतोपरी साह्य़ करेल, आवश्यक तर निधीदेखील देईल, अशी ग्वाहीदेखील फडणवीस यांनी दिली.
या पुरस्कारावरून राज्यात उफाळलेल्या वादाबद्दल प्रारंभी, आपल्या प्रास्ताविकात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, बाबासाहेबांच्या लिखाण व व्याख्यानांतूनच आम्हाला छत्रपती शिवरायांची ओळख झाली. मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी बाबासाहेबांना पुरस्कार दिल्याचा आरोप हा जावईशोधच आहे, असा टोला लगावत मी मराठा असल्याने बाबासाहेबांवर प्रेम करायचे नाही का, असा सवाल त्यांनी केला.
मुंबईचे पालकमंत्री या नात्याने बोलताना, बाबासाहेबांना हा पुरस्कार दिल्याने पुरस्काराचे मूल्य मोठे झाले अशी भावना सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बाबासाहेबांशी अतिशय जिव्हाळा होता आणि ते आज हयात असते, तर शुभेच्छा देण्यासाठी खचितच आले असते, असे त्यांनी सांगितले.
ठाकरे, खडसेंचीही अनुपस्थिती
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समारंभास अनुपस्थित होते. शिवसेना खासदार, आमदार यांनी हजेरी लावली. पण राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित नव्हते.