News Flash

युतीधर्मपालन नितीशकुमारांकडून शिका!

देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेला टोला

देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेला टोला

उमाकांत देशपांडे, लोकसत्ता

मुंबई : युतीधर्म कसा पाळायचा, हे शिवसेनेने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडून शिकावे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपची स्वबळावर सत्ता आणून दाखवू, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बिहार निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना फडणवीस म्हणाले, भाजपने नेहमीच दिलेला शब्द पाळला आहे. संयुक्त जनता दलाबरोबर युती असल्याने कोणाला कितीही जागा मिळाल्या तरी नितीशकुमार हे मुख्यमंत्री होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आम्ही शब्द पाळला आहे. महाराष्ट्रातही पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीआधी भाजपचा मुख्यमंत्री होईल, हे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सांगितले होते. त्यामुळे आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द देण्याचा प्रश्नच नव्हता.

नितीशकुमार यांनी भाजपबरोबर सत्तेत असताना युतीधर्माचे पालन व आचरण कसे केले, हेही शिवसेनेने पाहिले पाहिजे. या काळात नितीशकुमार यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपबाबत कोणतेही अनुद्गार काढले नाहीत किंवा टीकाही केली नाही. शिवसेना मात्र आमच्याबरोबर सत्तेत सहभागी होती. पण विरोधी पक्षांप्रमाणे शिवसेनेचे वर्तन होते. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि भाजपवर शिवसेनेने कायमच शिवराळ भाषेत आगपाखड केली, ‘सामना’तून लिखाण केले गेले. सत्तेत राहून फळे चाखायची आणि भाजपला दूषणे द्यायची, हे शिवसेनेचे वर्तन अयोग्यच होते, असे फडणवीस यांनी नमूद केले.

बिहारमध्ये भाजपच्या जागा अधिक आल्या, म्हणून नितीशकुमार यांनी आमच्यावर टीका केली नाही, की त्याबद्दल जबाबदार धरले नाही. शिवसेनेने मात्र कमी जागा आल्याबद्दल भाजपला दोष देऊन त्यांचे उमेदवार पाडल्याचा आरोप केला. भाजपबरोबर युतीमध्ये २५ वर्षे शिवसेना सडली, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. युतीमध्ये सहकारी पक्षाबरोबर प्रेम, सौहार्द व जिव्हाळ्याचे संबंध राखले गेले पाहिजेत, एकमेकांबद्दल विश्वास हवा. नितीशकुमार यांनी तसे आचरण केले. शिवसेना कायमच विरोधी पक्षाप्रमाणे वागत राहिल्याने त्यांना मुख्यमंत्रिपदाबाबत शब्द देण्याचा प्रश्नच नव्हता, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

‘त्या’ जमिनीप्रकरणी खुलासा करा!

रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्य़ात अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कागदपत्रे उघड केली आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेपुढे खुलासा करावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला दणका देण्याचे नियोजन..

’ बिहार निवडणुकीत भाजपचे प्रभारी म्हणून काम पाहिल्यावर फडणवीस यांनी आता मुंबई महापालिकेत भाजपची स्वबळावर सत्ता आणण्याचा चंग बांधला आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत हातातोंडाशी आलेला घास गेला, त्यामुळे ती चूक यावेळी न करता आतापासूनच तयारीला सुरुवात केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

’ योग्य नियोजन, संघटनात्मक कामाची आखणी, प्रभागनिहाय लक्ष केंद्रित करून आणि प्रतिपक्षांचे बलाबल लक्षात घेऊन धोरण ठरविण्यात येत आहे. आमदार-खासदारांसह अन्य नेत्यांवर जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत.

’ मुंबई महापालिकेत शिवसेनेला दणका देण्याचे भाजपचे नियोजन आहे. केवळ मुंबईच नाही, तर अन्य महापालिकांमध्येही भाजपचाच महापौर सत्तेवर आणण्याचे उद्दिष्ट आहे आणि आम्ही यश संपादन करू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 3:01 am

Web Title: devendra fadnavis praises nitish kumar over alliance issues zws 70
Next Stories
1 पदोन्नती प्रक्रियेला न्यायालयाची स्थगिती
2 काँग्रेस-राष्ट्रवादीला चार; शिवसेनेला एक जागा
3 ‘लोकसत्ता’ दिवाळी अंक : वैविध्यपूर्ण साहित्याची पर्वणी
Just Now!
X