News Flash

“आपल्याकडे प्रथा पडलीये, ऊठसूठ केंद्राकडे बोट दाखवायचं”, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यावर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (संग्रहीत छायाचित्र)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मराठा आरक्षण, मेट्रो कारशेड अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “आज मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली हे चांगलं आहे. नाहीतर आपल्याकडे जी प्रथा पडली आहे, ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवायचं, ती योग्य प्रथा नाही”, असं फडणवीस म्हणाले आहेत. तसंच, अशा चर्चांमधून महाराष्ट्राचा फायदाच होईल, असं देखील फडणवीस यांनी नमूद केलं.

…तर महाराष्ट्राचा फायदाच!

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला केंद्र सरकारशी समन्वय साधण्याचा सल्ला दिला. “महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले असतील, तर ते चांगलंच आहे. आम्ही तर हेच नेहमी सांगत असतो. कारण पंतप्रधान महाराष्ट्राबद्दल सकारात्मक असतात. राज्य आणि केंद्र यांनी आपापसांत संबंध चांगले ठेवले, तर राज्याचा फायदा होतो. आपल्याकडे जी प्रथा आहे की उठसूठ केंद्राकडे बोट दाखवायचं, ही प्रथा योग्य नाही. आज मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला, जाऊन भेट घेतली हे चांगलंय”, असं ते म्हणाले.

महाराष्ट्र सातत्याने केंद्राच्या अजेंड्यावर!

“अशा प्रकारच्या बैठकांमधून समन्वय साधला जातो. राजकारण निवडणुकीपुरतं असतं. पण इतर काळ समन्वयाची भूमिका असली, तर राज्याचा फायदा होतो. केंद्र सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्र सातत्याने राहिला आहे. त्यासंदर्भात भूमिका योग्य ठेवली, तर महाराष्ट्राचा त्यात फायदाच आहे”, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करावी; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

मराठा आरक्षणासंदर्भात ही भेट वेळेआधीची!

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणं हे प्रिमॅच्युअर अर्थात वेळेआधीचं असल्याचं म्हटलंय. “मराठा आरक्षणाच्या संदर्भात ही भेट प्रिमॅच्युअर आहे. भोसले समितीने मराठा आरक्षण पुन्हा मिळवायचं असेल, तर राज्यानं राज्य मागासवर्ग आयोगाची स्थानपना करून त्यामार्फत पुढील कारवाई करायला हवी असं सांगितलं आहे. पण ती कारवाई करण्यात आलेली नाही. पण तरीदेखील भेटले ते चांगलंच आहे. पुढे त्याचा फायदाच होईल”, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 1:41 pm

Web Title: devendra fadnavis reaction on cm uddhav thackeray meet pm narendra modi on maratha reservation pmw 88
Next Stories
1 करोनाशी लढणाऱ्या मुंबईकराच्या जीवाशी सुरू होता खेळ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2 उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?; भाजपाचा मुख्यमंत्र्यांना टोला
3 पगार देण्यासाठी पैसेच नसल्याचं सांगत मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेलने कारभार गुंडाळला
Just Now!
X