भारतातील तरुणांना संशोधनासाठी सिलिकॉन व्हॅली व सिंगापूरसारखे वातावरण तयार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची राज्य सरकारची तयारी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
वांद्रे-कुर्ला संकुलात रविवारी मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र इनोव्हेट्स-नेक्स्ट स्टेप या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या चर्चासत्रात मुख्यमंत्र्यांबरोबरच उद्योगमंत्री सुभाष देसाई, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, राज्य शासनाच्या इनोव्हेशन कॉन्सिलचे सहअध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, सहभागी झाले होते.
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी तरुण वर्गाची लोकसंख्या पाहता, नवनवीन कल्पना, आविष्कार आणि संशोधन हे देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळेच या तरुणांना संशोधनासाठी व नवे आविष्कार घडविण्यासाठी भारतातच सिलिकॉन व्हॅलीसारखे व सिंगापूरसारखे वातावरण निर्माण करण्याची देशाची व राज्याची जबाबदारी आहे. त्यासाठी राज्य सरकारची सहकार्य करण्याची तयारी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कल्पकतेला टिकाऊपणाची जोड हवी. आपल्याला मिळत असलेल्या माहितीचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी होणे आवश्यक आहे, असे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त
केले.
डॉ. माशेलकर म्हणाले की, भारताकडे असलेल्या नवनवीन कल्पनांमुळे भारताने केलेले आविष्कार जगभर सर्वश्रुत आहेत. जगात संशोधनाच्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी वेग, व्यापकता आणि टिकाऊपणा याची आवश्यकता आहे.