मोहनवीणेचे सूर, कैलाश खेर यांनी हिंदी व सुफी गीतांचे केलेले सादरीकरण आणि महाराष्ट्राची संस्कृती मांडणारा मराठी बाणा या कार्यक्रमांनी एलिफंटा महोत्सवाची संध्याकाळ उजळून निघाली. टाळ्या-शिट्टय़ांनी प्रतिसाद देत उपस्थित प्रेक्षकांनीही या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घेतला. मात्र, रविवारी महाराष्ट्र रजनी कार्यक्रमाप्रसंगी लागलेल्या आगीचे सावट या कार्यक्रमावर दिसत होते.

भारतीय व परदेशी संगीताचे मिश्रण असलेले फ्यूजन, हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ ठरले. कार्यक्रमाची सुरुवात पं. विश्वमोहन भट्ट यांच्या मोहनवीणा वादनाने झाली. सतार, वीणा आणि गिटार यांच्या एकत्रिकरणातून साकारलेल्या या मोहनवीणेतून पं. भट्ट यांनी श्यामकल्याण राग आळवत श्रुंगाररसाची उधळण केली.