महिलांनी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांची नोंद करण्यासाठी पुढे आलेच पाहिजे. महिला अत्याचाराचे आकडे फुगताना दिसले तरी अशा अत्याचारांच्या घटना पोलिसांना कळाल्यानंतर पीडित महिलेला लवकरात लवकर महिलांना मदत पोहोचवणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्य सरकार महिला अत्याचारांना कदापिही सहन करणार नाही, असेही त्यांनी अधोरेखित केले.
मुंबई पोलीस आणि वुमन्स जर्नलिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १०३ या महिला-बालकांच्या हेल्पलाइवर आधारित माहितीपटाचे अनावरण आणि असोसिएशनच्या उद्घाटनाचा समारंभ बुधवारी आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे आदी यावेळी उपस्थित होते. महिला अत्याचारांबाबत राज्य सरकार अतिशय सजग असून असे अत्याचार कदापी खपवून घेतले जात नाही. विविध पथकांच्या माध्यमातून महिला अत्याचारांना आळा घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.