बंडखोर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद

बहुमताच्या परीक्षेमध्ये भाजपवर मात करण्याचा महाआघाडीचा निर्धार

जवळपास एक महिन्याच्या सत्तानाटय़ात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सरशी होत असल्याचे दिसत असतानाच शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मात्र अचानक खेळाचे फासे उलटे पडले. उभा महाराष्ट्र नव्या आघाडीकडे उत्सुकतेने पाहात असतानाच शनिवारी सकाळी अचानक राजभवनावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत देशभरातील राजकीय वर्तुळास चक्रावणारा धक्का दिला.

भाजपच्या सत्ताकाळात आणि त्याआधी विरोधी बाकांवरूनही ज्यांना सिंचन घोटाळा प्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले, त्या अजित पवार यांच्याशीच हातमिळवणी करून फडणवीस यांनी सरकार स्थापन केले. आता फडणवीस आणि पवार यांनी महाराष्ट्रात सत्तासिंचनाचा नवा प्रयोग सुरू केला असून, ३० नोव्हेंबपर्यंत सभागृहात सरकारचे बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्याने, शपथविधीनंतर लगेचच संख्याबळाच्या जुळवाजुळवीस वेग आला आहे.

सरकार स्थापनेसाठी चर्चेच्या गुऱ्हाळात गुंतल्याने गाफील राहिलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीत सरकार स्थापनेच्या जल्लोषास उधाण येत होते. शिवसेनेने तर पेढे वाटपाची तयारीही सुरू केली होती. त्याच वेळी भाजपच्या गोटात मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शुकशुकाट वाटण्यासारखेच वातावरण होते. त्यामुळे भाजपने सत्तास्पर्धेतून माघार घेतल्याचा सर्वाचाच समज झाला.

महाविकास आघाडीच्या बैठकांना हजर राहून क्षणाक्षणाची खबर काढणारे राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार शुक्रवारी संध्याकाळी नाटय़मयरीत्या गायब झाल्याचे कोणाच्याच लक्षात आले नाही. त्यामुळे भाजपच्या गोटात अजित पवार यांच्या सत्तासिंचनाच्या अनुभवातून सरकार स्थापनेची तयारी सुरू असल्याचा सुगावादेखील कोणासच लागला नाही. शनिवारी सकाळी अचानक राजभवनावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी पार पडल्याच्या बातम्या सुरू झाल्या. लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून उभयतांचे अभिनंदन केले, आणि चर्चेची पुढील फेरी सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या महाआघाडीला खडबडून जाग आली. शरद पवार यांच्या मुरब्बी राजकारणाचे बाळकडू प्यायलेल्याअजितदादांनीच महाआघाडीस कात्रजचा घाट दाखविला अशी चर्चा सुरू झाली, आणि भांबावलेल्या मनस्थितीत महाआघाडीचे नेते भविष्यातील परिस्थितीस तोंड देण्याची तयारी करू लागले. कोणत्याही संकटास आम्ही आता एकत्रितपणे सामोरे जाऊ असा निर्धार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविला, तर भाजपने रात्रीस खेळ करून ‘फर्जिकल स्ट्राईक’ केल्याचा आरोप करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या खांद्यास खांदा लावून लढाईत उतरण्याचे संकेत दिले. काँग्रेसच्या गोटात पुन्हा एक बैठक पार पडल्यानंतर पक्षाचे केंद्रीय नेते अहमद पटेल यांनीही याच सुरात सूर मिसळला. चर्चेच्या गुऱ्हाळामुळे सत्तास्थापनेचा मुहूर्त निसटल्याचा इन्कार त्यांनी केला. आता येत्या ३० तारखेला विधिमंडळात फडणवीस-अजित पवार सरकारला बहुमताच्या परीक्षेमध्ये पाणी पाजण्याची तयारी महाविकास आघाडीने सुरू केली आहे, तर बहुमतासाठी विरोधी आघाडीतील नवे मासे सत्तेच्या धरणात गोळा करून गळाला लावण्याकरिता भाजपचे चाणक्य सज्ज झाले आहेत.

या घोळदार खेळात अनपेक्षितपणे बाजी मारणाऱ्या भाजपने दुपारी प्रदेश कार्यालयासमोर जल्लोष करून सत्तास्थापनेचा आनंद साजरा केला, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांनी संवाद साधला. ‘मोदी है तो मुमकीन है’ असे सांगत, या खेळाचे फासे कोठून टाकले जात होते, हेच त्यांनी स्पष्टपणे सूचित केले. इकडे हा जल्लोष सुरू असताना, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या महाआघाडीत मात्र, पुढे काय करायचे याच्या आखणीची नवी बैठक सुरू होती, आणि महाराष्ट्रभर या नाटय़मय दिवसाच्या चर्चेस उधाण आले होते.

घडामोडींचे घडय़ाळ

* शुक्रवारी रात्री ८ वाजता : भाजपने राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांच्यासह सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठीची प्रक्रिया सुरू  केली.

* रात्री ११.३० : अजित पवार यांचे पत्र राज्यपालांकडे सादर

* मध्यरात्री १२.३० :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीचा अहवाल केंद्र सरकारला पाठवला.

* मध्यरात्री १.३० : केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट उठवण्यास मंजुरी देत त्याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रपती भवनला पाठवला.

* सकाळी ५.४७ : राष्ट्रपती राजवट उठविण्याची अधिसूचना जारी

* ७.४५ : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी

* ९.३० : शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात दूरध्वनीवर संभाषण

* ११.०० : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना नेत्यांची बैठक. शरद पवार, उद्धव ठाकरे, अहमद पटेल यांच्यासह सारे नेते उपस्थित

* १२.३० : शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची  पत्रकार परिषद

* दुपारी १.३० : अहमद पटेल  यांची पत्रकार परिषद

* ३.०० : दिलीप वळसे-पाटील, तटकरे अजित पवार यांच्या भेटीला

* ३.३० : उद्धव ठाकरे  शिवसेना आमदारांच्या भेटीसाठी रवाना

* ४.०० : भाजप कार्यालयात जल्लोष, देवेंद्र फडणवीस यांचे भाषण

* ५.०० :  जयंत पाटील यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

विधिमंडळ पक्षनेतेपदावरून अजित पवार यांना हटविले

मुंबई : पक्षात बंड करून भाजपच्या गोटात दाखल झालेले अजित पवार यांना विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेपदावरून शनिवारी सायंकाळी हटविण्यात आले. त्यांचा पक्षादेश (व्हिप) काढण्याचा अधिकारही पक्षाने रद्द केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे विधिमंडळ पक्ष नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपला आणखी २६ आमदारांची गरज

मुंबई : विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याकरिता भाजपला २६ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. काही अपक्ष आमदार बरोबर असले तरी अजित पवार किती आमदारांचा पाठिंबा मिळवू शकतात यावरच फडणवीस सरकारचे भवितव्य अवलंबून असेल. भाजपचे १०५ आमदार निवडून आले. छोटे पक्ष आणि अपक्ष अशा १४ जणांचा पाठिंबा पक्षाने मिळविला होता. राज्यपालांच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना अनुक्रमे मुख्यमंत्री  आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाला सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी  सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या रिट याचिकेवर आज, साडेअकरा वाजता सुनावणी होणार आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन तातडीने रविवारीच बोलावले जावे आणि त्या कामकाजाचे चित्रीकरणही केले जावे, अशी विनंती न्यायालयाला केल्याचे ज्येष्ठ विधिज्ज्ञ देवदत्त कामत यांनी सांगितले.

काय होऊ शकते?

* विश्वासदर्शक ठरावावर फडणवीस सरकारची कसोटी लागेल

* अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणाकडे किती संख्याबळ आहे हे स्पष्ट होईल. कारण ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होते. यात मतांची फाटाफूट होऊ शकते.

* अध्यक्षांच्या निवडणुकीनंतर विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. २०१४ मध्ये तो आवाजी मतदानाने मंजूर केला होता.

* विश्वासदर्शक ठराव हा खुल्या मतदानाने घेतला जातो. या वेळी आमदारांना जागेवरून उभे राहून कोणाला मतदान करत आहे हे जाहीर करावे लागते. पक्षादेशाचा भंग केल्यास पक्षांतरबंदी कायद्यान्वये अपात्रतेची कारवाई होते.