सध्या आणीबाणीसदृश परिस्थिती असून राज्याच्या इतिहासात एवढे धमक्या देणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत, अशी परखड टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. आमच्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कितीही तक्रारी केल्या, तरी या नाकर्त्यां सरकारला वठणीवर आणण्यासाठी व जनतेसाठी भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करणारच, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, सर्वोच्च व उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेले निकाल हेच राज्य सरकारच्या कामाचे प्रगतीपुस्तक आहे. सत्तेचा व सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून आपल्याविरोधात बोलणाऱ्यांना धमकावणे सुरू आहे. मुख्य मंत्री पद स्वीकारताना ‘मी कोणावरही आकसाने किंवा द्वेषाने कारवाई करणार नाही,’ अशी देण्यात आलेली शपथ आणि संविधानाचेही विस्मरण उद्धव ठाकरे यांना झाले आहे.

पहिल्या वर्षपूर्तीनंतर सरकारने या काळात केलेले काम, भविष्यातील नियोजन, दिशा, याविषयी बोलणे अपेक्षित होते. पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मुलाखतीमध्ये हे काहीच नव्हते, केवळ धमकावणीची भाषा होती. सर्वोच्च व उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर राज्य सरकार आता कोणाला जबाबदार धरणार आहे व कोणती कारवाई करणार आहे,असा सवाल फडणवीस यांनी केला.

मराठा आरक्षणात घोळ..

मुख्यमंत्रीपदासाठी न दिलेले वचन यांच्या लक्षात राहते, पण शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार आणि ५० हजार रुपये मदतीचे दिलेले वचन का लक्षात राहत नाही,असा सवाल फडणवीस यांनी केला. मराठा आरक्षणात मोठा घोळ केला असून सर्वोच्च न्यायालयात सरकारचे वकीलही हजर राहत नाहीत. विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले, असा आरोप फडणवीस यांनी केला.