News Flash

मुंबईत १०० व्यक्तींमागे २८ जण करोना पॉझिटिव्ह; फडणवीसांनी व्यक्त केली चिंता

जून महिन्यात मुंबईत दररोज सरासरी केवळ ४००० चाचण्या

संग्रहित छायाचित्र.

मुंबईतील करोना परिस्थिती संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिलं आहे. “मुंबईत सातत्याने कमी होत असलेल्या चाचण्या, त्यामुळे संसर्ग शोधण्यात येत असलेल्या अडचणी, मृत्यूसंख्येची अद्याप होत नसलेली फेरपडताळणी, मृतदेहांची करोना चाचणी होत नसल्यामुळे करोना योद्ध्यांनाच मदतीपासून वंचित रहावे लागणे, याकडे तातडीने लक्ष द्यावे,” अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

“काल (१ जुलै ) केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना एक पत्र पाठवून मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्याचा आग्रह धरला आहे. विविध राज्यांमध्ये असलेली चाचण्यांची क्षमता आणि त्याचा वापर होत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईत १ जून रोजी २,०१,५०७ चाचण्या झाल्या होत्या. ती संख्या ३० जून रोजी ३,३३,७५२ इतकी झाली. याचा अर्थ जून महिन्यात मुंबईत १,३२,२४५ चाचण्या झाल्या आहेत. याचाच अर्थ मुंबईत दररोज सरासरी ४४०८ इतक्या चाचण्या होत आहेत. यातील पुन्हा होणार्‍या चाचण्यांची संख्या वजा केली तर ४००० चाचण्या दररोज होत आहेत. या १,३२,२४५ चाचण्यांपैकी ३६,५५९ इतके रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. याचाच अर्थ मुंबईत संसर्गाचे प्रमाण हे २८ टक्के आहे. म्हणजे प्रत्येक १०० व्यक्तींमागे २८ व्यक्तींना संसर्ग झाल्याचे आढळून येत आहे. देशाच्या तुलनेत हा दर कितीतरी अधिक आहे. देशात २९ जूनपर्यंत ८६,०८,६५४ चाचण्या झाल्या होत्या आणि त्यात ५,४९,९४६ रूग्णसंख्या होती. हा दर ६.३९ टक्के आहे,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“नियंत्रित चाचण्यांमधून रूग्णसंख्या कमी-अधिक भलेही करता येईल. पण, संसर्ग वाढण्याचा धोका यापेक्षा अधिक मोठा आहे. मुंबईतील आतापर्यंतच्या एकूण ४५५६ मृत्यूंपैकी या एकट्या जून महिन्यात ३२७७ मृत्यू दर्शविण्यात आलेले आहेत. आकडेवारी योग्य नसेल तर एकूणच प्रशासनाला करोनाविरूद्धची उपाययोजनांची दिशा आखणे अतिशय कठीण होऊन बसणार आहे. दररोज जवळजवळ २०० च्या आसपास मृत्यूसंख्या महाराष्ट्रात दाखविण्यात येते. त्यातील ६० ते ७० मृत्यू हे गेल्या ४८ तासांतील दाखविण्यात येतात आणि १२० च्या आसपास हे त्या पूर्वीचे म्हणून दर्शविले जातात. मृत्यूसंख्येची फेरपडताळणीची प्रक्रिया ही लगेच पूर्ण केली पाहिजे आणि रोजचे मृत्यू रोज दाखविले जातील, अशी व्यवस्था तातडीने उभारली पाहिजे. मुंबईत रूग्णालयाबाहेर झालेले मृत्यू एकदा संपूर्णपणे जाहीर केले पाहिजे. ही व्यवस्था झाल्याशिवाय कोविडविरूद्धची रणनीती आखणे अवघड होणार आहे. विशेषत: मुंबईतील रूग्णसंख्या या जून महिन्यात ९४ टक्के, ठाण्यात १६६ टक्के, कल्याण-डोंबिवलीत ४६९ टक्के, मिरा भाईंदरमध्ये ४१३ टक्के, भिवंडीत १४७० टक्के, पनवेलमध्ये ३६४ टक्के, नवी मुंबईत १९० टक्के इतकी वाढली असताना ही काळजी घेण्याची गरज अधोरेखित होते,” असंही फडणवीस म्हणाले.

“मृतदेहांची चाचणी न करण्याचा फटका आता थेट करोनायोद्ध्यांनाच बसतो आहे. ऐरोलीत बंदोबस्तावर असणारे पोलीस मंगेश कांबळे यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांची करोना चाचणी करण्यास रूग्णालयाने नियमावर बोट ठेवत नकार दिला. त्यांच्या पत्नीला लक्षणे असल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली आणि त्या करोना पॉझिटिव्ह आल्या. आता त्यांची चाचणी न झाल्याने करोनामृत्यू म्हणून त्यांच्या कुटुंबीयांना मिळू शकणारी मदत मिळणार नाही. शिवाय, यामुळे नेमके किती करोनामृत्यू झाले, हेही कळू शकणार नाही. अधिक संख्येने चाचण्या हाच या संकट निवारणातील मुख्य आधार असल्याने त्याकडे तातडीने लक्ष द्यावे. राज्याची पूर्ण चाचणी क्षमता त्वरित वापरावी,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 7:55 pm

Web Title: devendra fadnavis writes to cm uddhav thackeray about coronavirus situation in mumbai bmh 90
Next Stories
1 मुंबई विमानतळाच्या कामात गैरव्यवहार; ‘जीव्हीके’चे अध्यक्ष रेड्डी व संजीव रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हा
2 लालबागचा राजा मंडळाची ८७ वर्षांची परंपरा एकाकी खंडित होऊ नये, आशिष शेलारांचं आवाहन
3 आता भाजपातल्या चिनी टिकटॉक स्टार्सचं काय होणार? शिवसेनेची खोचक टीका
Just Now!
X