News Flash

पहिल्या देशी बनावटीच्या विमानावर अखेर शिक्कामोर्तब

या विमानाला मान्यता मिळविण्यासाठी यादव यांनी सन २०११ मध्ये विमान वाहतूक संचालनालयाकडे अर्ज केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कॅप्टन अमोल यादव. (संग्रहित छायाचित्र)

कॅप्टन अमोल यादव यांच्या विमानाला मान्यता; तपासणी केल्यानंतर उड्डाण परवाना

महाराष्ट्रीय तरुणाने बनविलेल्या पहिल्यावहिल्या भारतीय बनावटीच्या विमानावर तब्बल १७ वर्षांनंतर विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) मान्यतेची मोहोर उमटविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर कॅप्टन अमोल यादव नावाच्या मुंबईकराने बनविलेल्या सहा आसनी विमानाला मान्यता देण्याचा निर्णय  ‘डीजीसीए’ने घेतला असून, या विमानाला (व्हीटी-एनएमडी) नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. येत्या १० दिवसात संचालनालयाचे अधिकारी विमानाची तपासणी करणार असून त्यानंतर उड्डाण परवाना दिला जाणार आहे. त्यामुळे आजवर परदेशी बनावटीच्या विमानांवर अवलंबून राहणाऱ्या भारतातही नजीकच्या काळात विमाननिर्मितीचा मार्ग सुकर झाला आहे.

मूळचा सातारचा आणि सध्या मुंबईकर असलेल्या कॅप्टन अमोल यादव याने १९९८ मध्ये आपल्या ‘थर्स्ट एअरक्राप्ट’ कंपनीच्या माध्यमातून देशातील पहिल्यावहिल्या विमाननिर्मितीचा प्रयत्न सुरू केला. पहिला प्रयत्न पूर्ण होऊ शकला नाही. मात्र त्यामुळे नाउमेद न होता यादव यांनी २००३ मध्ये दुसऱ्या विमानाची निर्मिती सुरू केली. तो प्रकल्पही पूर्णत्वास गेला नाही. अखेर तिसऱ्या प्रयत्नात २००९ मध्ये सहा आसनी विमाननिर्मितीचा प्रयोग यशस्वी ठरला. या विमानाला मान्यता मिळविण्यासाठी यादव यांनी सन २०११ मध्ये विमान वाहतूक संचालनालयाकडे अर्ज केला. सुरुवातीस यादव यांच्या विमाननिर्मितीची थट्टा उडवीत संचालनालयाने त्यांचा अर्जच कचऱ्याच्या टोपलीत टाकला. नंतर तो हरवल्याचे आणि ज्या नियमाने नोंदणीचा अर्ज केला आहे, ते नियमच रद्द करण्यात आल्याचे सांगून यादव यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. त्यानंतरही यादव यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला असतानाच पंतप्रधानांची ‘मेक इन इंडिया’ची साद यादव यांच्या कामाला आली. वांद्रे- कुर्ला संकुलात भरलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात परवानगी नसतानाही यादव यांनी महत्प्रयासाने आपले विमान प्रदर्शनात मांडले. त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आणि या विमानाला मान्यता मिळण्याठी वर्षभर सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. विमान वाहतूक संचालनालयाने मात्र आपली नकारघंटा कायम ठेवल्याने मुख्यमंत्र्यानी थेट पंतप्रधान मोंदी यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी गेली. मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर संचालनालयाने रद्द केलेले नियम पुन्हा अमलात आणत कॅप्टन यादव यांच्या विमानाला नुकतेच नोंदणी प्रमाणपत्र दिले. त्याबद्दल यादव कुटुंबीयांनी आज मुख्यमंत्र्याची भेट घेऊन आभार मानले.१० दिवसात संचालनालयाचे अधिकारी विमानाची तपासणी करणार असून त्यानंतर उड्डाण परवाना दिला जाईल. हा परवाना मिळाल्यानंतर या पहिल्या विमानाचे उड्डाण सुरू होईल. यादव यांनी आता १९ आसनी विमानाची निर्मिती सुरू केली आहे. या प्रयत्नाची दखल घेत राज्य सरकारने त्यांना पालघर येथे विमानबांधणी प्रकल्पासाठी जागा देऊ केल्याचे कॅप्टन यादव यांनी सांगितले. औद्योगिक विकास महामंडळासोबत हा प्रकल्प सुरू करणार असून त्यासाठी सिकॉमतर्फे वित्तसाहाय्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही यादव यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 3:34 am

Web Title: dgca registers amol yadav aircraft
Next Stories
1 कोकण रेल्वेच्या पारदर्शक डब्याला भरघोस प्रतिसाद
2 ‘मराठी भाषा’ रुळावरून घसरली!
3 ‘ऑनलाइन शिष्यवृत्ती’ मोहिमेचा फज्जा!
Just Now!
X