मराठी साहित्यात ‘चरित्रकार’ अशी ओळख असलेल्या धनंजय कीर यांनी राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्यावर ‘श्री शाहू स्मारक व्याख्यानमाले’त व्याख्यान दिले होते. त्यापैकी राजर्षी शाहू छत्रपतींचे व्यक्तिदर्शन नि मूल्यमापन या व्याख्यानाचे संकलन..
छत्रपती शिवाजी महाराज हे प्रथम लोकनेते म्हणून पुढे आले. नंतर ते छत्रपती म्हणून भारताच्या इतिहासात अजरामर झाले. शाहू महाराज हे प्रथम छत्रपती म्हणून लोकांसमोर आले आणि मागाहून लोकनेते म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर झाले. सामान्य जनतेच्या जीवनाशी, त्यांनी स्वत:च्या उद्धारासाठी चालविलेल्या झगडय़ाशी समरस होऊन त्यांच्यामध्ये वावरणारा असा राजा त्यांच्या वेळच्या संस्थानिकांत त्यांच्यासारखा दुसरा कोणी झालाच नाही. महाराष्ट्रातही त्यांच्या कालखंडात लोकमान्य टिळक यांच्याखेरीज छत्रपती शाहूंएवढा कीर्तिमान नि प्रभावशाली नेता अन्य कोणी झाला नाही.
  छत्रपती शाहू हे जरी भारतीय राजकारणात प्रत्यक्ष भाग घेत नव्हते, तरी महाराष्ट्रात ते अप्रत्यक्षपणे सामाजिक क्षेत्रातील टिळकांचे प्रतिस्पर्धी म्हणून मानण्यात येत असत. महाराज हे अधिकाराने नि औदार्याने राजे होते, तर टिळक औदार्याने राजे. टिळकांचे शिक्षणप्रसाराचे कार्य वरिष्ठ वर्गात घडले. छत्रपतींचे शिक्षणकार्य बहुजन समाजासाठी झाले. छत्रपती शाहू महाराज जनतेला, दलितांना नि पददलितांना जीव एकवटून सांगत की, ‘‘मी माझी मते सोडणार नाही किंवा जीव बचावण्यासाठीदेखील शरण जाणार नाही. मी मोडेन पण वाकणार नाही. सरकार रागावेल असे तुम्ही म्हणता. रागावो बिचारे. मला त्रास होईल यात संशय नाही; परंतु गरजवंतांना मदत केल्याबद्दल, अस्पृश्यांना हात दिल्याबद्दल नि मराठय़ांचा उद्धार करण्याकरिता माझी शक्ती खर्च केल्याबद्दल परमेश्वराकडून मला खचित न्याय मिळेल. बहुजन समाजाच्या उद्धाराचे पवित्र कार्य मी प्राण जाईतोवर सोडणार नाही.’’
टिळकांचे हरिजनांसंबंधीचे धोरण कचखाऊ होते, उपकारक नव्हते, न्याय्य नव्हते. ‘प्रत्यक्ष देव अस्पृश्यता पाळू लागला तर मी त्याला देव म्हणून ओळखणार नाही,’ असे टिळकांनी कर्मवीर शिंदे यांनी भरविलेल्या ज्या अस्पृश्यता निवारण परिषदेत भाषण केले, त्याच परिषदेत, ‘मी आपल्या वैयक्तिक दैनंदिन जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही’, असे जाहीर करणाऱ्या जाहीरनाम्यावर त्यांनी सही करण्यास नकार दिला. ‘जर कोणी माझ्या देशाचे स्वराज्य मिळविले तर त्यांच्या पंक्तीस मी जेवेन,’ असे टिळक म्हणत. म्हणजे सामाजिक समता त्यांना मान्य नव्हती. छत्रपती शाहू हे महार, मांग, कातकरी, बुरुड यांना पंक्तीस घेऊन जेवत असत, त्यांच्या मडक्यातले ते पाणी पीत असत. वस्त्र, वित्त, विद्या आणि स्वाभिमान यांना मुकविलेल्या अस्पृश्यांची गुलामगिरीतून मुक्तता करून त्यांना मानवी स्वातंत्र्याचे हक्क देणारी घोषणा भारताच्या इतिहासात तोपर्यंत दुसऱ्या कोणत्याही राजाने आपल्या राज्यात केली नव्हती.
जातिभेद मोडणे हे महाराजांचे खरे ध्येय होते. समाजसुधारणेच्या उद्देशाने विधिमंडळात आलेल्या सर्व विधेयकांना टिळकांनी विरोध केला, पण छत्रपतींनी सर्व विधेयकांना पाठिंबा दिला. लोकमान्यांनी संमती वयाच्या विधेयकास विरोध केला. लग्नाचे वय वाढवावे अशा उद्देशाने नामदार श्रीनिवास शास्त्री यांनी १९१५ साली पुढे आणलेल्या विधेयकास त्यांनी विरोध केला. विठ्ठलभाई पटेल यांनी १९१८ साली आंतरजातीय विवाह कायदेशीर ठरविण्यासाठी जे विधेयक आणले, त्यालाही त्यांनी विरोध केला. छत्रपतींनी पटेल विधेयकास पाठिंबा दिला, इतकेच नव्हे तर आपल्या संस्थानात पुनर्विवाहाचा याचप्रमाणे आंतरजातीय विवाहाचा कायदा असे दोन्ही कायदे संमत केले.
टिळकांनी स्वराज्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. ते भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक होते. राष्ट्रीय त्यागाचे प्रतीक होते. छत्रपतींनी आपले राज्यपद नि जीवित सामान्य जनतेच्या हक्कासाठी पणास लावले. शिक्षणप्रसाराने, आपल्या सामाजिक कर्तृत्वाने नि त्यागी जीवनाने छत्रपतींनी महाराष्ट्रातील ब्राह्मणेतरांत जागृती निर्माण केली. समाजकारण नि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत आपल्या हक्कांसाठी लढण्यास त्यांना उभे केले. त्यांनी बहुजन समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना वृत्तपत्र काढण्यास आर्थिक साहाय्य केले. ज्यांनी ज्यांनी राष्ट्रजागृती, धर्मजागृती नि समाजजागृती केली, लोकहितकारक ग्रंथलेखन केले, कलेत वा कुस्तीत, नाटय़ात वा लोकनाटय़ात चांगली कामगिरी केली, त्यांना त्यांनी उत्तेजन दिले. जनदोषांचे निर्मूलन करणे आणि नवीन गुणांची प्रस्थापना करणे, नवीन निष्ठेने आणि नव्या उत्साहाने सामान्य जनांस वागण्यास शिकविणे या सामाजिक प्रगतीच्या दोन्ही अंगांना त्यांनी चालना दिली. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी नि वास्तववादी होता. त्यांची प्रेरणा नैतिक होती. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाला ते महत्त्व देत. रोगनिवारणार्थ लस टोचून घेत.
छत्रपतींच्या विचारात, आचरणात दलितोद्धाराचा कळवळा महात्मा फुले यांच्याइतकाच जळजळीत होता. त्यांची अस्पृश्योद्धाराची तळमळ नि कार्य पाहून ‘नि:स्वार्थी मिशनरी भावनेचे अद्वितीय उदाहरण’ असा छत्रपतींचा गौरव महात्मा गांधींनी केला होता. जातिभेद मोडणे हे छत्रपतींचे ध्येय होते. छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव नि ठसा केवळ महाराष्ट्राच्या धर्मसुधारणेवर वा समाजकारणावरच पडला आहे असे नाही. महाराष्ट्राची गेल्या पन्नास वर्षांत जी वैचारिक, शैक्षणिक, औद्योगिक, राजकीय नि कलाविषयक क्षेत्रांत नवी जडणघडण झाली, तीत त्यांचा वाटा फार मोठा आहे. नवमहाराष्ट्र घडविण्यात या थोर पुरुषाचा फार मोठा भाग आहे.
संकलन – शेखर जोशी
(शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरप्रकाशित ‘श्री शाहू स्मारक व्याख्यानमाला, मार्च १९७०’ या धनंजय कीर यांच्या पुस्तकावरून साभार)

नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा मंडळ यांच्या सहकार्याने आणि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड व तन्वी हर्बल्स यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर झालेल्या ‘लोकसत्ता’ वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी आहे.

virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, sanjay mandlik controversial statement, shahu maharaj, historians criticise sanjay mandlik, shivsena, bjp, congress, lok sabha 2024, election 2024, mahayuti, maha vikas aghadi, kolhapur politics, kolhapur shahu maharaj, controversial statment on shahu maharaj,
छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
nagpur and bhandara,dhirendra shastri, bageshwar dham, controversial statement, jumdev maharaj, followers, Sparks Outrage, fir register, arrest demand, maharashtra, marathi news,
बागेश्वर बाबा वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत, जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भंडारा, नागपूरमध्ये तणाव