23 November 2019

News Flash

दुष्काळाच्या प्रश्नावर विधानपरिषदेत धनंजय मुंडे आक्रमक

शेतकऱ्यांना पूर्वमशागतीच्या कामासाठी हेक्टरी २५ हजार रुपयांची तातडीने मदत द्या अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

(संग्रहित छायाचित्र)

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज विधानपरिषदेत धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना पूर्वमशागतीच्या कामासाठी हेक्टरी २५ हजार रुपयांची तातडीने मदत द्या अशी मागणी केली. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुंडेंनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला मात्र, सभापतींनी हा प्रस्ताव फेटाळून लावला असला तरी त्यांना बोलण्याची संधी दिली यावेळी धनंजय मुंडे यांनी सरकारचे दुष्काळाकडे होत असलेले दुर्लक्ष आणि शेतकऱ्यांच्या मागण्या याबाबत जोरदार बाजू मांडली.

यावर्षी अर्ध्यापेक्षा अधिक महाराष्ट्र १९७२ पेक्षा भीषण दुष्काळाला सामोरा जात असताना पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा, हाताला काम, विशेष आरोग्य सेवा आणि इतर घोषित दुष्काळी उपाययोजनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. जाहीर केलेली आर्थिक मदत, बियाणे आणि मान्सूनपूर्व मशागतीच्या अनुदानासाठी रोख मदत मिळालेली नसल्यामुळे शेतकरी ‘अस्मानी आणि सुलतानी’ अशा दुहेरी संकटात सापडला असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्ज माफीपासून लाखो शेतकरी वंचित आहेत. उलट बँका नियमित साडेतेरा टक्के व्याज तसेच दंडनीय व्याजाची आकारणी करीत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीला सुरवात झाली असताना आणि शेतकऱ्याला पीक कर्जाची नितांत आवश्यकता असताना बँकांनी NPA चा बागुलबुवा उभा करून पिककर्जाला नकार देत असल्याचा आरोप त्यांनी केला.

गेल्या ३ महिन्यात अनेकवेळा सोसाट्याच्या वाऱ्यासह, गारपीठ, वीज कोसळून फळबागा, इतर पिके, मच्छिमार बांधवांचे तसेच घरांचे प्रचंड नुकसान व जीवित हानी होऊनही नुकसानभरपाई जाहीर न केली जाणे, बोंडअळी, तुडतुडा रोग नुकसान भरपाई, दूध अनुदान यापासूनही शेतकरी वंचित आहे. एकूणच दुष्काळी उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी, जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचे वाटप याबाबत सरकार अपयशी ठरले असून बियाणे आणि पूर्वमशागतीच्या तयारीसाठी हेक्टरी २५ हजाराची मदत, वादळ, गारपीठीमुळे नुकसान झालेल्या फळबागांना हेक्टरी १ लाख आणि अन्य पिकांसाठी हेक्टरी ५० हजाराची मदत जाहीर करण्याची मागणी यावेळी धनंजय मुंडे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व विरोधी पक्षाच्या आमदारांनी या मागणीला पाठींबा दिला. मात्र, त्याला सरकारने प्रतिसाद न दिल्याने कामकाज १० मिनिटासाठी तहकूब करण्यात आले.

छावण्यांबाबत आक्रमण
प्रश्नोत्तराच्या तासातही चारा छावण्यांच्या बाबतीतील प्रश्नावर चर्चेत सहभागी घेताना राज्यात १६०० छावण्यांना केवळ २०० कोटी रुपये देऊन सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. जनावरांना टॅगींगसारखे नियम लावून शेतकऱ्यांना त्रास दिला जातो आहे, असा आरोपही धनंजय मुंडे यांनी यावेळी केला.

First Published on June 18, 2019 2:15 pm

Web Title: dhananjay munde aggressive in the vidhan parishad question on drought aau 85
Just Now!
X