भ्रष्टाचाराची चौकशी टाळल्याने विरोधकांचा सभात्याग

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काही विभागांतील भ्रष्टाचारांवर केलेले आरोप त्या विभागांच्या मंत्र्यांनी फेटाळून लावले. खोटे आरोप केले जात असल्याचा दावा मंत्र्यांनी केला. त्यावरुन मंत्री व विरोधी नेत्यांमध्ये आव्हाने-प्रतिआव्हानाची भाषा झाली. भ्रष्टाचाराची चौकशी टाळली जात असल्याची टीका करीत, भ्रष्टाचारी मंत्र्यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत घोषणा देत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.

विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना धनंजय मुंडे यांनी तुर भरडाईच्या कंत्राटात दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करुन या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यावर सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी उत्तर देताना मुंडे यांचे आरोप फेटाळून लावले. १३१३ कोटी रुपयांची तूर खरेदी केली असताना, त्यात दोन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार कसा झाला असा सवाल देशमुख यांनी केला.

गोदामातील  तुरीची लवकरात लवकर डाळ तयार करुन ती विकण्यासाठी निविदा प्रक्रियेत जास्तीत जास्त कंत्राटदारांनी सहभागी व्हावे, यासाठी भरडाई करणाऱ्यांबरोबर पुरवठादारांनाही संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. परंतु तूर भरडाईसाठी मिलची गरज असते, पुरवठादाराचा काय संबंध असा प्रश्न मुंडे यांनी विचारला. मंत्र्यांच्या तोंडी सूचनेनुसार निविदेत सोयीच्या अटी टाकण्यात आल्या, त्याची फाईलवर तशी नोंद आहे, त्याबद्दल मंत्री काही बोलत नाहीत किंवा त्या संबंधित अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार याबद्दल मौन बाळगले जात आहे, याकडे लक्ष वेधून मुंडे यांनी सहकार मंत्र्यांना पुन्हा खिंडित गाठण्याचा प्रयत्न केला.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही त्यांच्या नातेवाईकांना कोरडवाहू शेती अभियानंतर्गत कृषी अवजारे खरेदीसाठी आर्थिक लाभ मिळाल्याचे मुंडे यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. त्यातील काही प्रकरणे २०१३-१४ मधील आधीच्या सरकारमधील आहेत. तर काही प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार झालेलाच नाही. परंतु विरोधी पक्ष नेते खोटे आरोप करीत आहे, असा आक्रमकपणे खोत यांनी विरोधी पक्षांवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला.  त्यालाही मुंडे यांनी आपण  भक्कम पुराव्याच्या आधारे आरोप केले आहेत, त्याची चौकशी होऊन जाऊद्या असे प्रतिआव्हान खोत यांना दिले. तोरणमाळ रिसॉर्ट प्रकरणात केलेले भ्रष्टाच्या आरोपांचाही पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी इन्कार करीत, विरोधी पक्ष नेते दिशाभूल करीत आहेत, असा आक्षेप घेतला. काही वेळ रावल व मुंडे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली.

न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी

म्हाडाच्या भूखंड वाटपात झालेल्या १६०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत मंत्र्यांकडून उत्तरच आले नाही, त्याबद्दल धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. सर्व मंत्र्यांनी आरोप फेटाळले असले तरी, त्याची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी मुंडे यांनी केली. परंतु त्यावर सरकारकडून काहीच उत्तर न आल्याने त्याचा निषेध करीत आणि भ्रष्ट मंत्र्यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.