या सरकारचे वाघांकडे योग्य लक्ष नसल्यामुळे दिवसेंदिवस त्यांची संख्या कमी होत चालली आहे. अवघ्या ४८ तासात सात वाघांचे मृत्यू ही गंभीर गोष्ट असून त्याची तात्काळ चौकशी झाली पाहिजे. खरतर एकूणच वाघ या शब्दाबाबतच सरकार गंभीर नसावे अशी शंका येते. त्यामुळेच वाघ चिन्ह असलेल्यांकडेही तुमचे दुर्लक्ष असल्यामुळे त्यांचीही सभागृहातील संख्या कमीच दिसते असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगताच विधान परिषद सभागृहात एकच हशा पिकला..

विदर्भात ४८ तासांमध्ये झालेल्या सात वाघांच्या मृत्युवरून धनंजय मुंडे यांची सरकारविरोधात जोरदार टोलेबाजी सुरु होती. तात्काळ या वाघांची चौकशी करा असे सांगतानाच त्यांची नजर सत्ताधारी बाकावरील शिवसेनेच्या सदस्यांकडे गेली. शिवसेनेचे बहुतेक सदस्य त्यावेळी सभागृहात उपस्थित नसल्याचे लक्षात येताच मुंडे यांनी भाजपला चिमटा कढताना जंगलातील वाघांप्रमाणेच वाघ चिन्ह असलेल्यांकडे तुमचे दुर्लक्ष असल्यामुळे सभागृहातील वाघांची संख्याही कमी झाल्याचा टोला लगावला. यावर, ‘तुम्ही चिंता करू नका, आमचे जंगलातल्या व मुंबईतील वाघांकडेही लक्ष आहे’, असे वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यावर मुंबईतील वाघ सतत नाराजी व्यक्त करत असून या वाघांच्या संख्येची काळजी घ्या, असे सुनील तटकरे यांनी सांगितले तेव्हा तुमच्याच अध्यक्षतेखाली एक समिती नेमून वाघांच्या संख्येवर लक्ष देऊ असे मुनगंटीवार मिश्किलपणे म्हणाले. ‘चला कामकाज पुढे नेऊ या, सभागृहात आत्ता एकच वाघ दिसतो आहे’, असे सभापतींनी सांगताच एकच हशा पिकला.