राज्यातील भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी होत नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा घेत विरोधकांनी आज विधान परिषदेचे कामकाज ठप्प केले आहे. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याप्रमाणे सर्वच भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी व्हायलाच हवी, असा मुद्दा उपस्थित करीत विरोधकांनी विधान परिषदेत सरकारवर चौफेर टीकास्त्र सोडले. अखेर गदारोळामुळे दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावे लागले.

शिवसेना-भाजप युतीचे सरकार चौकशीला घाबरत असून, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सर्व मंत्र्यांची चौकशी आयोग कायद्याअंतर्गत चौकशी करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.  सभागृहाचे कामकाजावर बहिष्कार टाकल्यानंतर विधानभवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे म्हणाले की, पुरावे दिले तर आम्ही चौकशी करू असे सातत्याने मुख्यमंत्री सांगत असतात. त्यामुळे आम्ही सरकारमधील सर्व भ्रष्ट मंत्र्यांविरोधात पुरावे देखील आता सादर केले. तरीही कारवाई होत नसल्याने आज पुन्हा एकदा विधानपरिषदेचे कामकाज आम्ही बंद केले. सर्व मंत्री स्वच्छ आहेत असे सरकारचे म्हणणे असेल तर चौकशीला का घाबरता?, असा सवाल मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच जोपर्यंत भ्रष्टाचारी मंत्र्यांची चौकशी केली जाणार नाही, तोपर्यंत विधानपरिषदेचे कामकाज चालू देणार नसल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले. पावसाळ्यात सवलतीच्या दरातले जसे मान्सून सेल लागतात तसाच सेल सरकारने या अधिवेशनात क्लिन चीट देण्याचा लावला असल्याचा टोला धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

युती सरकारच्या काही मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्‌द्‌यांवर गेल्या दोन दिवसांपासून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत चर्चा सुरू होती. या चर्चेला गेल्या शुक्रवारी उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप झालेल्या मंत्र्यांना क्‍लीन चिट दिली होती. त्यानंतर आज परिषदेच्या कामकाजास सुरवात होताच विरोधकांनी भ्रष्ट मंत्र्याच्या चौकशीसाठी आग्रह धरला आणि कामकाज बंद पाडून फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले.