07 March 2021

News Flash

नालेसफाईचे 200 कोटी कोणाच्या खिशात गेले : धनंजय मुंडे  

राज्यातील परिस्थितीला सरकार आणि पालिका जबाबदार असल्याचे ते म्हणाले.

संग्रहित छायाचित्र

दोन दिवसाच्या पावसामुळे देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई ठप्प झाली आहे. चार दिवसात 40 लोकांचे जीव जातात. रस्त्यावर पाणी तुंबलं आहे, लोकांच्या घरात पाणी शिरलय, रेल्वे बंद आहे. मुंबईला स्मार्ट सिटी बनवितांना मुंबईकरांचे हाल केले जात असून मुंबईच्या या बिघडलेल्या परिस्थितीत राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकाच जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. मुंबईच्या मालाड भागात 16 जणांचा झालेला मृत्यू आणि पावसामुळे मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्याच्या विविध भागात विस्कळीत झालेल्या जनजीवनासंदर्भात विधान परिषदेत तातडीची चर्चा उपस्थित करण्यात आली होती. यावेळी बोलतांना धनंजय मुंडे यांनी मुंबईमध्ये चालू वर्षी नालेसफाईवर केलेले 200 कोटी रुपये कोणाच्या खिशात गेले असा सवालदेखील केला.

मुंबईमध्ये 26 जुलै, 2005 च्या घटनेनंतर पर्जन्य जलवाहीन्यांवर हजारो कोटी खर्च करण्यात आले. तरीही या परिस्थितीत काहीही फरक पडला नाही. नाले सफाईवर गेल्या 10 वर्षात 3 ते 4 हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे हे पैसे जातात कुठे असा सवाल मुंडे यांनी केला. तसेच महापालिकेतील सत्ताधारी आणि पहारेकऱ्यांनी मुंबापुरीची तुंबापुरी केली असल्याचा टोला लगावला.

महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी आपण मागील चार वर्षापासून करीत असतांना सरकार चौकशीला का घाबरते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच मुंबई महानगरपालिका ही निवडणुकीची संस्था आहे असा सत्ताधाऱ्यांचा दृष्टीकोन असल्यामुळे मुंबईकरांना वेठीस धरले जात असल्याचे ते म्हणाले. करुन दाखविले म्हणणाऱ्यांच्या मातोश्री घराबाहेर पाणी साचले आहे, यांनी करुन नाही दाखवले तर  मुंबईला भरुन दाखवले आहे. मुंबई तुंबली असतांना फक्त पाणी साचले म्हणणाऱ्या मुंबईच्या महापौरांच्या वक्तव्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला.

मालाडच्या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तातडीने पाच लाख रुपये मदत देण्याची तत्परता मुख्यमंत्र्यांनी दाखवली.  मात्र, अशी तत्परता घटना घडू नयेत यासाठी दाखवायला हवी होती असे ते म्हणाले. पुण्याच्या कोंढवा भागात भिंत कोसळून 16 जणांच्या झालेल्या मृत्युच्या घटनेसंदर्भात बोलतांना केवळ सरकारी मदत देऊन गुन्हा दाखल करुन सरकारला आपली सोडवणूक करता येणार नाही असे ते म्हणाले. आज कधी कुठली भिंत कोसळेल?  किती जणांचा जीव जाईल?  याची भिती मुंबई आणि राज्यात कच्च्या झोपडीत राहणाऱ्या गरीब माणसांच्या मनात निर्माण झाली आहे. सरकारचे मुंबई आणि शहरांबद्दल अनास्थेचे जे धोरण आहे त्यामुळेच त्यांच्या जिवावर सरकारने मृत्यूची टांगती तलवार उभी केली असल्याचे मुंडे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 2:15 pm

Web Title: dhananjay munde on water logging issue vidhan parishad cm devendra fadnavis shiv sena jud 87
Next Stories
1 नालेसफाईबाबतचे धोरण मुंबई महापालिकेने जाहीर करावे : मुख्यमंत्री
2 मुंबई महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमा – अजित पवार
3 १९ मजुरांच्या मृत्यूंना महापालिका नाही तर पाऊस जबाबदार-संजय राऊत
Just Now!
X