डोंबिवलीतील धनश्री गोडवे मृत्यूप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाचा दावा
मध्य रेल्वे मार्गावर गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या लोकलमधून खाली पडून प्रवाशांचे बळी जात असताना दोन दिवसांपूर्वी धनश्री गोडवे या डोंबिवलीकर तरुणीच्या अपघाताप्रकरणी रेल्वे सुरक्षा विभागाने तयार केलेल्या अहवालामुळे नवा वाद ओढविण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. धनश्रीचा अपघात हा लोकलमधील गर्दीमुळे नव्हे तर सतत दरवाजात उभे राहण्याच्या तिच्या आग्रहामुळे झाला, असे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.
डोंबिवली स्थानकातून दररोज प्रवास करणारी धनश्री सोमवारी सकाळी घरातून बाहेर पडली. नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर कार्यालयात जायचे असल्याने तिने जलद गाडीतून जाण्याचा प्रयत्न केला आणि तिचा अपघात घडला. यामध्ये तिचा मृत्यू झाल्याने डोंबिवलीकर प्रवाशांमध्ये नाराजीचे तीव्र सूर उमटू लागले आहेत. बुधवारी सकाळी या भागातील काही प्रवासी संघटनांनी संघटित होत मूक आंदोलनही केले. या वेळी प्रवासी संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांना या अहवालासंबंधी माहिती देण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाने सादर केलेल्या अहवालानुसार धनश्री ही डब्यात बाहेर लोंबकळत असल्याच्या चित्रीफिती हाती लागल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा अहवाल सादर केला असल्याचे सूत्रांकडून समजते.
गर्दी असो वा नसो धनश्री नित्यनेमाने लोकलच्या दारात उभी राहून प्रवास करीत असे. गेल्या २० दिवसांचे सीसीटीव्ही रेल्वे सुरक्षा दलाने तपासले आहे. त्यामध्ये धनश्री सतत लोकलच्या दरवाजात उभी राहत असल्याचे दिसून आले आहे.याबाबतचा सविस्तर अहवाल सुरक्षा दलाने मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांकडे पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

धनश्रीच्या प्रवासाचे सीसी टीव्ही फुटेज तपासले असून ती लोकलच्या डब्यात शेवटच्या क्षणी चढताना दिसून येते. ती प्रवास नेहमीच लोकलच्या दारातून केला जात होता का याचा तपास करत आहोत. प्रथमदर्शनी ती दारातून प्रवास करत असल्याचे दिसते.
– एम. के. श्रीवास्तव, वरिष्ठ निरीक्षक रेल्वे सुरक्षा दल

एका तरुण मुलीचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्यानंतर गर्दीकमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे सोडून रेल्वे अपघातात चूक कोणाची, याचा तपास करते? ही रेल्वेची असंवेदनशीलताच आहे.
– लता आरगडे, उपाध्यक्ष उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ