धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने अद्याप केंद्र सरकारला पाठविला नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुल केल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सांगितले. धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. आता या विषयावरून कोणतेही राजकारण करण्यात येऊ नये, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील शेतकऱयांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये अजित पवारांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विविध नेते उपस्थित होते. या भेटीनंतर पत्रकारांना माहिती देताना धनगर समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारला पाठविला नसल्याचे फडणवीस यांनी कबुल केल्याचे अजित पवार म्हणाले.
केंद्रीय आदिवासी विकासमंत्री जोएल ओरम यांनी शरद पवार यांना पाठविलेल्या पत्रात राज्य सरकारने यासंबंधीचा प्रस्ताव पाठविला नसल्याचे म्हटले होते. त्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्य सरकारवर टीका केली होती. सत्तेवर आल्यानंतर १५ दिवसांत धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन देणारे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत. त्यांनी दिलेले शब्द पाळावेत, असा चिमटा शरद पवार यांनी यापूर्वी काढला होता.