धारावी स्मशानभूमीत मृतदेहाचे दहन केल्यानंतर आजूबाजूला पसरणाऱ्या धुरामुळे येथील रहिवाशांना होणाऱ्या त्रासातून त्यांची लवकरच सुटका होणार आहे. महापालिकेने हा तयार होणारा धूर हवेत सोडण्यासाठी ५० लाख ९५ हजार रुपये खर्च करून चिमणी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
धारावी स्मशानभूमीत मृतदेहाचे दहन करण्यासाठी लाकडांचा वापर करण्यात येतो. स्मशानभूमीच्या आजूबाजूला निवासी वस्ती मोठय़ा प्रमाणात असल्याने मृतदेहाच्या दहनानंतर पसरणाऱ्या धुराचा नागरिकांना त्रास होत होता. याबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन महापालिकेने चिमणी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
वॉटर स्क्रबिंग यंत्रणा आणि अन्य तांत्रिक सुविधेसह ही चिमणी उभारण्यात येणार आहे. धारावी स्मशानभूमीत मृतदेहांचे दहन करण्यासाठी सहा चौथरे असून यापैकी एक चौथरा कमी करून पाच चौथऱ्यांवर वॉटर स्क्रबर यंत्रणा बसविण्यात येणार आहे.