|| निशांत सरवणकर

सेकलिंक आणि अदानी इन्फ्रा यापैकी एका कंपनीची निवड करणार

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा अंतिम विकासक जानेवारी महिन्याच्या अखेरीस ठरणार आहे. दुबईस्थित सेकलिंक आणि अदानी इन्फ्रा या दोन कंपन्यांपैकी एकाची निवड होणार आहे. ३१८० कोटी रुपयांची बँक गॅरन्टी आणि ३८० कोटींचे भांडवल असलेल्या कंपनीची या प्रकल्पासाठी नियुक्ती होणार आहे. सध्या या दोन्ही निविदांची छाननी सुरू आहे.

२०१४ मध्ये सत्तेवर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळ आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती दिली जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार बीडीडी चाळीच्या पुनर्विकासास सुरुवात झाली आहे, तर धारावी पुनर्विकासासाठी जागतिक पातळीवर निविदा जारी करण्यात आल्या. या प्रकरणी निविदापूर्व बैठकीत अनेक विकासकांनी रस दाखविला होता. मात्र निविदा सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी फक्त  सेकलिंक या एकाच कंपनीची निविदा आली होती. त्यामुळे निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. आता अदानी इन्फ्रा ही कंपनीही सहभागी झाली आहे. यापैकी कुठल्या कंपनीची निवड करायची याचे सर्वाधिकार धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. आर. श्रीनिवास यांना देण्यात आले आहेत. सध्या या प्रकल्पांतर्गत येणारा रेल्वेचा भूखंड संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

विकासक ठरल्यानंतर भूखंड संपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात उपजिल्हाधिकारी व कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यासाठी प्राधिकरणाने मंत्रिमंडळापुढे यादी सादर केली आहे. याशिवाय प्रकल्पबाधितांसाठी संक्रमण शिबिरे उभारण्यासाठी मिठागराचा काही भूखंड मिळावा, या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला ४२०० च्या आसपास संक्रमण शिबिरातील रिक्त घरे आवश्यक आहेत. पाऊण लाख इतक्या झोपुवासीयांना मोफत, तर २००० ते २०११ पर्यंतच्या झोपुवासीयांना खर्च आकारून घरे देण्यात येणार आहेत. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात सुरुवातीला पाच भाग करण्यात आले होते. त्यापैकी पाचवा भाग म्हाडामार्फत विकसित केला जात होता, परंतु म्हाडाला या प्रकल्पाच्या एक पंचमांश भागही विकसित करता आला नाही. त्यामुळे आता संपूर्ण धारावी परिसरासाठी एकच विकासक नियुक्त करण्यात येणार आहे. या विकासकासोबत राज्य शासन विशेष हेतू कंपनी स्थापन करणार आहे. विकासकाला आणखी काही विकासकांना सोबत घेऊन समूह स्थापन करता येणार असल्याकडेही एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले.

धारावी पुनर्विकास प्रकल्प हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तो मार्गी लागावा यासाठी विशेष हेतू कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जागतिक स्तरावर जारी केलेल्या निविदा प्रक्रियेत दोन कंपन्या सहभागी झाल्या आहेत. त्यापैकी एकाची निवड होईल.   – एस. आर. श्रीनिवास, मुख्य कार्यकारी अधिकारी, धारावी पुनर्विकास प्राधिकरण