मुख्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा; आरोग्यसुविधा क्षेत्रातही काम करण्याबाबत पुढाकार

दुबईतील प्रसिद्ध एमबीएम समूहाने मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासह महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांत सहकार्य करण्यास सहमती दाखवली आहे. तर डीपी वर्ल्ड समूहाने बहुद्देशीय लॉजिस्टिक पार्कच्या उभारणीत आणि थुम्बे समूहाने आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांमध्ये सहकार्याची तयारी दाखवली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले. या दौऱ्यात अनेक संस्था, कंपन्यांशी ते संवाद साधणार असून, त्यातून राज्यातील कृषी विकास, पायाभूत सुविधा आणि राज्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान आधारित उपक्रमांना गती देणार आहेत.

या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात शनिवारी दुबई येथे फडणवीस यांच्या शिष्टमंडळाचे आगमन झाले.  मुख्यमंत्री फडणवीस यांची डीपी वर्ल्डचे समूह अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अहमद बिन सुलाएम यांच्याशी चर्चा केली. डीपी वर्ल्डने राज्य सरकारसह बहुद्देशीय लॉजिस्टिक पार्कच्या उभारणीत योगदान देण्याची तयारी दर्शविली. विशेषत: नागपुरात काम करण्यास हा समूह उत्सुक आहे. डीपी वर्ल्ड ही जगातील आघाडीची कंपनी राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीमध्ये (एनआयआयएफ) भागीदार असलेली कंपनी आहे.

एमबीएम समूहाचे अध्यक्ष अरमन शेख मोहम्मद बिन जुमा अल मक्तुम यांच्याशीही मुख्यमंत्र्यांची सायंकाळी भेट झाली. मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासह राज्यातील विविध नागरी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी सहकार्य करण्याविषयी शेख मोहम्मद बिन जुमा अल मक्तुम यांनी या भेटीत सहमती दाखवली.

थुम्बे समूहाचे संस्थापक अध्यक्ष थुम्बे मोईदीन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्र सरकारसोबत आरोग्यसुविधा क्षेत्रात काम करण्याची तसेच यासंदर्भात सामंजस्य करार करण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली आहे.