02 March 2021

News Flash

धर्मेंद्र, हिराणी यांना ‘राज कपूर’; विजय चव्हाण, मृणाल कुलकर्णी यांना ‘व्ही. शांताराम’ पुरस्कार

राज्य शासनाचे पुरस्कार घोषित; ५५ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात होणार वितरण

राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे ‘राज कपूर’ आणि ‘चित्रपती व्ही. शांताराम’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यांपैकी राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना घोषित झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज या पुरस्कारांची घोषणा केली. यंदाच्या ५५व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

अवघे ४ दशक आपल्या अभिनयाने रसिकांचे मनं जिंकणारे हरहुन्नरी कलावंत म्हणजे विजय चव्हाण. विजय चव्हाण हे मराठी चित्रपटसृष्टीत सहाय्यक कलाकार म्हणून आले. विजय चव्हाण यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने गेल्या अनेक वर्षापासून मराठी चित्रपटसृष्टी गाजविली आहे. ‘झपाटलेला’, ‘पछाडलेला’, ‘भरत आला परत’, ‘जत्रा’, ‘घोळात घोळ’, ‘आली लहर केला कहर’, ‘माहेरची साडी’, ‘येऊ का घरात’ यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांच्या भुमिका प्रचंड गाजल्या. ‘मोरुची मावशी’ हे विजय चव्हाण यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेले नाटक. या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडविला.

मृणाल कुलकर्णी यांनी मराठी-हिंदी चित्रपट, नाटक, टेलिव्हिजन या तिन्ही क्षेत्रात काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘रमा माधव’ या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनातून त्यांनी दिग्दर्शिका म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिक्षण घेत असताना ‘स्वामी’ या मालिकेतून मृणाल कुलकर्णी यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ‘राजवाडे अँड सन्स’, ‘कशाला उद्याची बात’, ‘यल्लो’ या मराठी चित्रपटांमध्ये मृणाल यांनी विविध भुमिका साकारल्या आहेत. त्यासोबत ‘आशिक’, ‘राम गोपाल वर्मा की आग’, ‘रास्ता रोको’, ‘छोडो कल की बातें’, ‘मेड इन चायना’ या हिंदी चित्रपटांमधूनही मृणाल कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली. ‘राजा शिवछत्रपती’, ‘मीरा’, ‘स्पर्श’, ‘गुंतता ह्दय हे’, ‘अवंतिका’ या टीव्ही मालिकांव्दारेही त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले आहे.

१९६० ते १९८० या दशकात सिल्वर स्क्रीन गाजवणारा हिमॅन अभिनेता म्हणजे धर्मेद्र. १९६० साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेद्र यांनी आता पर्यंतसुमारे २५० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटाने त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. १९७६ ते १९८४ च्या काळात त्यांनी अनेक ॲक्शनपट केले. ‘जुगनू’, ‘ललकार’, ‘ब्लॅकमेल’, ‘यादों की बारात’ या चित्रपटांमुळे ते ॲक्शन हिरो म्हणून नावजले जाऊ लागले. हेमा मालिनींसोबतची त्यांची जोडी नेहमीच हिट राहिली.

राजकुमार हिराणी यांचा जन्म १९६२ साली नागपूर येथे झाला असून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक अशी त्यांची ओळख आहे. विधू विनोद चोप्रा यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाला सुरवात केली. त्यांनी स्वत: प्रमुख दिग्दर्शक म्हणून मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाला राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनंतर त्यांनी ‘लगे रहो मुन्ना भाई’ व ‘३ इडियट्स’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून हे तिन्ही चित्रपट सुपरहिट झाले. राजकुमार हिरानी यांना आजवर फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक सिने-पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2018 12:17 pm

Web Title: dharmendra hirani announced raj kapoor award and vijay chavan mrinal kulkarni announced v shantaram awards
Next Stories
1 खरात यांच्या प्रभागात पोटनिवडणुकीची कुजबुज
2 ‘मेट्रो-३’च्या बांधकामस्थळावरील ध्वनिप्रदूषणाची तपासणी ‘निरी’कडून
3 ‘लोकसत्ता गप्पां’च्या पुढच्या पर्वात संवाद ‘रावीपार’च्या लेखकाशी
Just Now!
X