DHFL चे सीईओ कपिल वाधवा यांना ED ने (अंमलबजावणी संचलनालय) अटक केली आहे. या कारवाईमुळे दिवाण हाऊसिंग फायन्सास लिमिटेड अर्थात डीएचएफलच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. इक्बाल मिर्ची मनी लाँडरिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात बेकायदा निधी जमवल्याचा आरोप कपिल वाधवा यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वाधवा यांची रवानगी ईडीच्या कोठडीत करावी जेणेकरुन त्यांची याप्रकरणी चौकशी करता येईल अशी विनंती विशेष न्यायालयाला करण्यात आली आहे.

मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच ईडीने रणजीत सिंग बिंद्रा आणि हारुन युसूफ या दोन एजंट्सना अटक केली होती. ज्यानंतर इक्बाल मिर्चीच्या मालमत्तेतील गैरव्यवहारांचा छडा लागला. २०१३ मध्येच इक्बाल मिर्चीचा मृत्यू झाला. त्याने ८० च्या दशकात मोहम्मद युसूफ ट्रस्टच्या वरळी येथील तीन मालमत्ता साडेतीन लाखांना विकत घेतल्या होत्या. ज्या त्याच्या मृत्यूनंतर २०० कोटींना विकण्यात आल्या. या व्यवहारात रणजीत बिंद्रा आणि हारुन युसूफ हे दोघे एजंट होते. ही मालमत्ता ज्या सनब्लिंक या कंपनीला विकण्यात आली ती कपिल आणि धीरज वाधवा या दोघांशी संबंधित आहेत. याच प्रकरणात वाधवा हे तपासात सहकार्य करत नसल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.