News Flash

‘लोकसत्ता संपादक शिफारस’चे तिसरे नाटय़पुष्प..‘ढोलताशे’!

गडकरी रंगायतनमध्ये रविवारी शुभारंभाचा प्रयोग

गडकरी रंगायतनमध्ये रविवारी शुभारंभाचा प्रयोग
महाराष्ट्रातील विविध कला, साहित्य आणि संस्कृतीची जोपासना करण्याच्या ‘लोकसत्ता’च्या बांधिलकीचा एक भाग म्हणून सुरू झालेल्या ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ योजनेंतर्गत तिसरे नाटय़पुष्प म्हणून भद्रकाली प्रॉडक्शन्स निर्मित, नाटककार चं. प्र. देशपांडे लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘ढोलताशे’ या नाटकाची निवड करण्यात आली आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग उद्या, २४ जानेवारीला दुपारी ४.३० वा. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये सादर होत आहे.
‘ढोलताशे’ हे नाटक आपल्याकडच्या सार्वजनिक उत्सवांतील उन्माद, ध्वनी तसेच वायुप्रदूषण आणि सार्वजनिक उत्सवांतील अनिष्ट गोष्टींवर ताशेरे ओढणारे आहे. उपरोध आणि उपहासात्मक शैलीतील हे नाटक प्रेक्षकाला विचारप्रवण तर करतेच; त्याचबरोबर सामाजिक दंभाला विनोदाच्या शर्करावगुंठित डोसातून हसतखेळत टाचणीही लावते. उत्तम रंजनमूल्ये हेही ‘ढोलताशे’चे एक वैशिष्टय़ आहेच. सद्य:परिस्थितीत अशा रीतीने एका महत्त्वाच्या सामाजिक विषयाला तोंड फोडणारे हे नाटक रंगभूमीवर येणे ही काळाची निकड होती. ती ओळखूनच ‘लोकसत्ता’ने हे नाटक पुरस्कृत केले आहे. ‘ढोलताशे’चे नेपथ्य राजन भिसे यांचे असून, संगीत राहुल रानडे यांचे आहे. प्रकाशयोजनेची धुरा शीतल तळपदे सांभाळत आहेत. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमधील आदित्य तसेच ‘दिल, दोस्ती, दुनियादारी’मध्ये कबीरची भूमिका साकारणारे ललित प्रभाकर हे या नाटकाद्वारे प्रथमच व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करीत आहेत. तर रंगभूमी व मालिकांतून आपल्या सकस अभिनयाने स्वत:चे स्थान निर्माण करणारे राजन भिसे, क्षिती जोग, उज्ज्वला जोग, अभिजीत गुरू, अमृता संत आणि दस्तुरखुद्द दिग्दर्शक विजय केंकरे हे कलाकार ‘ढोलताशे’मध्ये अन्य प्रमुख भूमिका साकारत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 2:37 am

Web Title: dhol tasha marathi play coming soon in thane theater
Next Stories
1 भरधाव गाडीची पाच जणांना धडक
2 सचिन तेंडूलकर जिमखाना, मातोश्री क्लबचे भूखंड ‘खेळाच्या मैदानांच्या’ यादीतून वगळले?
3 लोहमार्गावरील अपघाती मृत्यूंमध्ये कमालीची घट
Just Now!
X