किडनीच्या विकारांवरील उपचार म्हणून करण्यात येणारी ‘डायलिसीस’ पद्धती अवघ्या साडेसतरा रुपयांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. खासगी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पीपीपी तत्त्वावर पालिकेतर्फे मुंबईतील १३ ठिकाणी अत्यंत माफक दरात ‘डायलिसीस’ पुरवण्यात येणार आहेत.
खासगी डायलिसीस केंद्रांमध्ये दीड ते दोन हजार रुपये शुल्क आकारण्यात येत असताना पालिकेने पाच केंद्रांमध्ये दोनशे रुपयांत ही उपचार सुविधा पुरवली आहे. आता अवघ्या साडेसतरा रुपयांत ही सेवा मिळणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शताब्दी, एस. के. पाटील, कुर्ला भाभा, व्ही. एन. देसाई, डॉ. आंबेडकर, सिद्धार्थ, आजगावकर ट्रॉमा सेंटर, कूपर, फुले, माँ या पालिका रुग्णालयांत तसेच मागाठाणे, साईबाबा नगर आणि बनाना लिफ, अंधेरी या १३ ठिकाणी तीन महिन्यांत डायलिसिस केंद्रे सुरू होतील, अशी माहिती सार्वजनिक खासगी सहभाग प्रोत्साहन विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष मुझुमदार यांनी दिली. या केंद्रांमध्ये कमीत कमी साडेसतरा ते ३५० रुपयांपर्यंत डायलिसिसची सेवा मिळेल.
स्वस्त दरात औषधविक्री
केईएमच्या धर्तीवर आता लो. टिळक रुग्णालयात तसेच कांदिवली येथील डॉ. आंबेडकर रुग्णालयातही २० टक्के सवलतीत औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आहे. पालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ही सवलत मिळू शकेल.
डायलिसिस केंद्रांतील रुग्णक्षमताही वाढणार
किडनीविकारावरील डायलिसिस उपचारपद्धती गरीब रुग्णांनाही परवडणाऱ्या दरांत उपलब्ध करून देतानाच आणखी १३ केंद्रे वाढवून या केंद्रांची रुग्णक्षमता वाढवण्याचा निर्णयही पालिकेने घेतला आहे. अत्यल्प शुल्कात सेवा मिळत असल्याने पालिकेच्या डायलिसिस केंद्रांकडे रुग्ण जाऊ लागल्याने आता खासगी केंद्रांनीही त्यांच्याकडील शुल्क कमी केले आहे.
पालिकेने सुरू केलेल्या पाच केंद्रांची रुग्णक्षमता ६२ असून नव्याने सुरू होणार असलेल्या १३ केंद्रांमध्ये एकूण २०६ रुग्णक्षमता आहे. मुक्ताबाई रुग्णालय, पोईसर, बॅण्डस्टॅण्ड आणि सेंट जॉन रोड वांद्रे येथेही डायलिसिस केंद्र प्रस्तावित असून त्यातून आणखी ७५ रुग्णक्षमता वाढेल. ही केंद्रे नियमित सुरू झाल्यास सध्या जाणवणारा डायलिसिस केंद्रांचा तुटवडा गतकाळात जमा होऊ शकेल. या केंद्रांसाठी पालिका जागा देणार असून डायलिसिस मशीन, तज्ज्ञ व देखभालीचा खर्च संबंधित संस्था करणार आहेत. या केंद्रांवर पालिकेचे नियंत्रण राहणार असून सेवेमधील नियमितता तसेच दर्जा तपासण्यासाठी पालिकेचे आरोग्य अधिकारी नेमले जातील. या सेवांमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित संस्थेचे कंत्राट रद्द केले जाईल, अशी माहिती अभियंता एस. एस. तांदळे यांनी दिली.
पालिकेने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने दोनशे रुपयांत डायलिसिसची सेवा देणारी पाच केंद्रे बोरिवलीतील मागाठाणे व साईबाबा नगर तसेच राजावाडी, एम. डब्ल्यू देसाई आणि अगरवाल रुग्णालयात सुरू केली आहेत,  अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.