उदानी हत्याप्रकरणी महत्त्वाचे पुरावे पोलीसांच्या हाती

मुंबई : हिरे व्यापारी राजेश्वर उदानी (५७) यांची हत्या घणसोलीजवळ  करण्यात आली. तर आरोपींनी हत्येचा कट विक्रोळीच्या टागोर नगरमध्ये आखल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले.

उदानी यांच्या अपहरणाआधी मुख्य आरोपी सचिन पवार अन्य आरोपींना टागोर नगर येथे भेटला. त्याने प्रत्येकाला काम वाटून दिले. त्यानंतर तो घाटकोपर येथे राजकीय पक्षाच्या बैठकीला गेला. या हत्याप्रकरणात प्रत्येकवेळी त्याने स्वत:ला पडद्याआड ठेवले. मात्र टागोर नगर येथे उदानी यांचे अपहरण करण्याआधी तो अन्य साथीदारांसह गुन्ह्यत वापरलेल्या कारसह उपस्थित होता, हे स्पष्ट करणारे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

उदानी यांना संशय येऊ नये म्हणून आरोपी सनिने लक्षद्वीप बारमधील बारबालेच्या मुलीला सोबत घेतले. त्यासाठी तिला चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवले. अदानी बारबालेसोबत कारमध्ये बसले. कार घणसोली येथे थांबवून निलंबित पोलीस शिपाई दिनेश पवार आणि त्याचे साथीदार कारमध्ये घुसले आणि त्यांनी उदानी यांची हत्या केली.

हे सिनेमातील दृश्य!

आरोपी कारमध्ये घुसताच बारबाला घाबरली. सचिनच्या आगामी चित्रपटात असाच एक प्रसंग आहे. उदानी आणि आम्ही त्याची तालीम करत आहोत, अशी थाप दिनेशने बारबालेला मारली आणि तिला गप्प बसवले. दिनेशने उदानी यांचा मृतदेह पनवेलजवळच्या नेरे गावात फेकला तेव्हा मात्र ही तालीम नव्हती तर उदानी यांची हत्या केल्याचे बारबालेच्या लक्षात आले. तोंड उघडलेस तर तुलाही ठार करू, अशी धमकी देत दिनेश बारबालेला घेऊन अलिबाग-मुरूडला गेला. बारबालेच्या चौकशीतून हा घटनाक्रम उघड झाला. तिला साक्षीदार करण्याचा पोलीसांचा विचार आहे.

नोकराच्या मोबाईल, मैत्रिणीची कार

नामानिराळे राहण्यासाठी सचिनने आपल्या कंपनीतील नोकराचा मोबाईल घेतला. याच मोबाईद्वारे तो आधी मुंबई आणि नंतर गुवाहाटीतून साथीदारांच्या संपर्कात होता. लोखंडवाला संकुलातील मैत्रिणीची कार दहा दिवसांपुर्वी त्याने घेतली. नोकराकरवी बनावट नंबर प्लेटही बनवून घेतली, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पार्टीनंतर हत्येचा विचार

सचिनने १८ नोव्हेंबरला उदानी यांना गोरेगाव येथील घरी बोलावून मेजवानी दिली. सचिनची प्रेयसी देवोलिना भट्टाचार्यजीही तेथे उपस्थित होती. ‘मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला तडजोडी कराव्या लागतात. तू सांभाळून रहा’, अशी टिप्पणी उदानी यांनी केली. ती सचिनला खटकली. शिवाय उदानी समाजमाध्यमांद्वारे देवोलिनाच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्नही करू लागले होते. त्यामुळे त्यांची हत्या  करण्याचे ठरवले अशी कबुली सचिनने पोलीसांना दिली.

तिसरा आरोपी अटकेत

उदानी यांचे अपहरण ज्या कारमधून करण्यात आले त्या कारचा चालक प्रणित भोईर याला पनवेल येथून अटक करण्यात आली. उदानी यांचा मृतदेह नेरे येथे फेकण्याचा सल्ला प्रणितचा असावा, असा संशय पोलिसांना आहे.