कर चुकवून आणलेले एक कोटींचे हिरे मुंबई सेंट्रल पोलिसांनी जप्त केले केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी हिरे कंपनीचा कर्मचारी कौशलकिशोर तिवारी (५१) याला ताब्यात घेऊन आयकर विभागाकडे सुपूर्द केले आहे.
सुरत येथून कर चुकवून एक इसम हिरे घेऊन मुंबई सेंट्रल स्थानकात गुरुवारी सकाळी येणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जयपूर सुपरफास्ट ट्रेनमधून उतरलेल्या तिवारीच्या सामानाची तपासणी केली असता  एक कोटी दोन लाख रुपये किंमतीचे हिरे आढळले. तो ऑपेरा हाऊस येथील बीवी चिनाई हिरे कंपनीचा कर्मचारी आहे. ठरल्याप्रमाणे हैद्राबादला थेट न जाता मुंबईत का आला, या प्रश्नाचे तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही तसेच कर आणि जकातही चुकविल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. मागेही त्याच्याकडून अशाच एका प्रकरणात आयकर विभागाने चार लाखांचा दंड आकारल्याची माहिती माहिती मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र त्रिवेदी यांनी दिली.