मुंबईमधील कुर्ला, गोवंडी, घाटकोपर, देवनार, वांद्रे, मालाड, दहिसर आदी परिसरांमध्ये अतिसाराच्या (गॅस्ट्रो) साथीचा प्रादुर्भाव झाला असून जानेवारीपासून आतापर्यंत २,२८० जणांना अतिसाराची बाधा झाली आहे. दूषित पाणी आणि बर्फामुळे अतिसाराच्या साथीचा प्रादुर्भाव होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत असून रस्त्यावर विकण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थाविरोधात कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

दूषित पाणी आणि बर्फामुळे मुंबईच्या अनेक भागांमध्ये अतिसाराच्या साथीने डोके वर काढले आहे. जानेवारीपासून काही भागांत अतिसाराने त्रस्त झालेले रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे २,२८० रुग्णांना अतिसाराची बाधा झाली आहे. एप्रिलमध्ये ९१६ जण अतिसाराची बाधा झाली होती. रस्त्यावर उघडय़ावर विकण्यात येणारे खाद्यपदार्थ, दूषित पाणी आणि बर्फामुळे अतिसाराच्या साथीचा प्रादुर्भावावर होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कुर्ला परिसरामध्ये २०७ जणांना अतिसाराची बाधा झाली आहे, तर गोवंडी, चेंबूरमध्ये (९७ रुग्ण), घाटकोपर (९२), देवनार (६४), वांद्रे (७०), खार (३४), मालाड (७९), दहिसर (४८) अतिसारग्रस्त रुग्ण आढळून आले.

मुंबईमध्ये उघडय़ावर विकण्यात येणारे खाद्यपदार्थ जलजन्य आजारांना कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे जलजन्य आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या रस्त्यावरील खाद्यपदार्थाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी यापूर्वीच दिले आहेत. अतिसाराच्या साथीने डोके वर काढल्यामुळे उघडय़ावरील खाद्यपदार्थ आणि सरबतांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्याचे स्पष्ट आदेशच आयुक्तांनी पुन्हा एकदा संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.