नीलेश अडसूळ

अतिचारा सेवनामुळे गाईंमध्ये अतिसाराची लागण

रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या गाईला चारा खायला घालून पुण्य पदरात पाडून घेण्याची मुंबईकरांची हौस या गाईंच्या मात्र ‘पोटावर’ येत आहे. सतत कोरडा चारा खाल्ल्याने या गाईंच्या शरीरातील पाणी कमी होऊन त्या जलशोष (डीहायड्रेशन), अतिसार, अपचनाच्या समस्यांनी ग्रस्त होतात. उन्हाळ्यात या त्रासात अधिकच भर पडत असल्याने अशा अनेक गाई सध्या परळच्या ‘बाई साकरबाई दिनशॉ पेटीट पशुचिकित्सालया’त म्हणजेच बैलघोडा रुग्णालयात उपचाराकरिता येत आहेत.

चाऱ्याबरोबरच गाईंना पुरेशा पाण्याचीही गरज असते. त्या अनेक जण त्यांना घरातले शिळे किंवा नैवेद्य म्हणून तयार केलेले अन्न खाऊ घालतात. या तेलकट आणि शिळ्या पदार्थामुळे जनावरांना वांत्या आणि पोटाचे विकार होतातच. त्यांना दिल्या जाणाऱ्या लाडवातील घटकांबाबतही प्रश्नचिन्ह आहे. त्यात चाऱ्याच्या सततच्या अतिसेवनामुळे प्राण्यांच्या आतडय़ांवर ताण येतो. पण प्राण्यांच्या जीवावर व्यवसाय करणाऱ्या अनेकांकडून जनावरांच्या प्रकृतीबाबत हलगर्जीपणा होतो. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर कुठे त्यांना रुग्णालयात आणले जाते. अशा अनेक गाई बैलघोडा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असल्याचे रुग्णालयाचे प्रमुख डॉ. जे. सी. खन्ना यांनी सांगितले. केवळ गाईंकरिताच नव्हे तर रस्त्यावर बांधल्या जाणाऱ्या अशा प्राण्यांकरिता शक्य तिथे पाण्याचे साठे उभारले तर प्राणी-पक्ष्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी भावना खन्ना यांनी व्यक्त केली.

रस्त्यांवरील गाईच नव्हे तर अनधिकृतपणे प्राणी पाळून त्यांचे शोषण करून व्यवसाय करणाऱ्यांवर महापालिकेने कायदेशीर कारवाई करायला हवी, अशी मागणी प्राणीमित्र आनंद पेंढारकर यांनी दिली. नागरिकांनीही अशा प्रकाराला धार्मिक भावनेतून खतपाणी न घालता पालिकेकडे रीतसर तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केली.

अशा अनधिकृतरीत्या पाळलेल्या किंवा भटक्या जनावरांवर आणि त्यांच्या मालकांवर कारवाई करण्याचे काम पालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य आणि देवनार पशुवधगृह  विभागातर्फे केले जाते. पालिकेने मार्च २०१७ ते मार्च २०१९ या दोन वर्षांत १२००हून प्रकरणांमध्ये विविध प्रकारची जनावरे ताब्यात घेत मालकांवर कारवाई केल्याचे पशुवैद्यकीय आरोग्य विभाग आणि देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेटे यांनी सांगितले.

तापमानाचा दाह पक्षी-प्राण्यांनाही

गेल्या काही दिवसांत अशा १५० प्राणी-पक्ष्यांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. यात ४०हून अधिक घार, ३५हून अधिक कबुतर, ३०हून अधिक कावळे, कोकीळ, विविध प्रजातींची घुबडे यांचा समावेश होता. यंदा मोठय़ा प्रमाणात समुद्री पक्ष्यांना रुग्णालयात उपचाराकरिता आणले गेले. पाण्याचे अपुरे साठे, झाडांची घटती संख्या आणि आकाशात उंच उडत असल्याने पक्ष्यांना तापमानाशी अधिक जवळून सामना करावा लागतो. परिणामी शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने निर्जलन होऊ न पक्षी बेशुद्ध होत आहेत. अशा पक्ष्यांना पाण्यातून जीवनसत्त्व, ग्लुकोज, रोगप्रतिकारक औषधे देऊन त्यांना भरारी घेण्यासाठी सक्षम करण्याचे काम येथे होते. उपचारांसोबतच पक्ष्यांना पुरेशी विश्रांती घेऊ दिली जाते. ही जागा बंदिस्त नाही. त्यामुळे त्यांना मुक्तपणे विहरता येते. रुग्णालयात उपचाराकरिता येणाऱ्या या प्राण्यांसाठी इथे कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे.

पाळीव प्राण्यांची काळजी आवश्यक

श्वान-मांजरासारखी पाळीव जनावरे पाळणाऱ्यांनीही उन्हाळ्याच्या दिवसात पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घ्यायला हवी, असे मत डॉ. खन्ना यांनी व्यक्त केले. अनेकदा सकाळी दहानंतर पाळीव प्राण्यांना फेरफटका मारण्यासाठी नेले जाते. परंतु भर उन्हात उष्णतेमुळे त्यांना खूप घाम येतो व त्वचाविकार बळावतात. त्यामुळे प्राण्यांना सकाळी दहाच्या आधी किंवा सायंकाळी फिरायला न्यावे, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच रस्त्यावरील भटक्या जनावरांना उन्हाचा फटका बसत असल्याने नागरिकांनी आपल्या आवारात, इमारतीच्या आसपास पाण्याचे छोटे साठे किंवा भांडी भरून ठेवावीत. गॅलरीत, खिडकीजवळ पाणी आणि धान्याच्या वाटय़ा भरून ठेवल्यास पक्ष्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी पुस्ती त्यांनी जोडली.