जुलै २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलशी भारताचे अधिकृत संबंध प्रस्थापित होऊन २५ वर्षे झाल्याबद्दल त्या देशाला भेट दिली. त्या दौऱ्यात त्यांनी हैफा येथील युद्ध स्मारकात आदरांजली वाहिली. पहिल्या महायुद्धात २३ सप्टेंबर १९१८ रोजी ऑटोमन तुर्क साम्राज्य आणि जर्मनीच्या संयुक्त फौजांकडून ब्रिटिशांच्या सैन्यातील भारतीय जवानांनी हैफा हे शहर जिंकून घेतले. या युद्धाची खासियत म्हणजे तुर्क आणि जर्मन सैन्य आधुनिक तोफखाना आणि मशीनगन्सनी सज्ज होते. उलट ब्रिटिशांच्या १५ व्या इंपेरियल कॅव्हलरी ब्रिगेडमधून लढलेल्या जोधपूर, हैद्राबाद आणि म्हैसूर संस्थानांच्या सैनिकांकडे  केवळ भाले आणि तलवारी होत्या. तरीही भारतीय लान्सर्सनी शत्रूवर मात करत हैफा जिंकले. जगाच्या इतिहासातील घोडदळाची आणि भालाईत सैनिकांची ही कदाचित अखेरची महत्त्वाची लढाई. त्यामुळेच आजही दरवर्षी भारतीय लष्करात २३ सप्टेंबर हा  ‘हैफा दिन’ म्हणून साजरा केला जातो. तसेच नवी दिल्लीत १९२२ साली बांधण्यात आलेले ‘तीन मूर्ती स्मारक’ जोधपूर, हैद्राबाद आणि म्हैसूरच्या सैनिकांच्या स्मृती जपण्यासाठी उभे केले आहे.

भाल्यासारखी फेकण्याची अस्त्रे सैनिकांना अधिक पल्ला (रेंज) आणि आवाका (आऊटरिच) मिळवून देतात. निव्वळ हाताने भाला फेकताना त्याच्या वेग व पल्ल्यावर मर्यादा येतात. भाल्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी अगदी सुरुवातीच्या काळापासून उत्तर व मध्य अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आदी प्रदेशांतील आदिवासी टोळ्या एक सोपी पण प्रभावी शक्कल वापरत. थोडासा फाटा फुटलेल्या काठीच्या टोकाला भाला टेकवून त्याने तो फेकायचा. त्या काठीला ‘अ‍ॅटलाटल’ किंवा ‘स्पिअर थ्रोअर’ म्हणत. त्याने भाल्याचा वेग आणि पल्ला बराच वाढत असे.

भाल्याच्या लांबी आणि रचनेनुसार त्याचे अनेक प्रकार होते. भाल्याच्या टोकाचे फाळ   सुरुवातीला  ‘फ्लिंटस्टोन’ (गारगोटीचा दगड), ‘ऑब्सिडियन’ (लाव्हारसातून उत्पन्न झालेला काचेसारखा दगड) यांचे बनवत. धातूकलेच्या उगमानंतर ते लोखंड, ब्राँझ, पोलाद आदींपासून बनवले जाऊ लागले. त्यातही हातात धरून वापरला जाणारा ‘स्पिअर’ किंवा ‘लान्स’ आणि फेकण्याचा लांबीने थोडा कमी ‘जॅव्हलीन’ असे भाल्याचे प्रकार आहेत.

भाला हे साधे पण प्रभावी शस्त्र असून भालाईत सैनिकांनी आणि त्यांच्या डावपेचांनी युद्धावर मोठा परिणाम केला आहे. सिकंदर किंवा अलेक्झांडरची भूमी मॅसिडोनियामध्ये ‘सरिसा’ नावाचे बरेच लांब भाले वापरले जात. असे भाले आणि ढाली धारण करणाऱ्या सैनिकांच्या ‘फलँक्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आघाडीच्या फळीतील तुकडय़ांनी त्या काळात युद्धभूमीवर प्रभुत्व गाजवले होते. ग्रीक सैनिकांचे ‘पायलम’ नावाचे लांब भालेही आघाडीच्या सैनिकांना मोठी ताकद देत. अशी फळी भेदणे शत्रूपक्षासाठी जवळपास अशक्य असे.

भारतात भाल्यांचे गजकुंत, अश्वकुंत, पदातीकुंत असे हत्ती आणि घोडय़ावरून तसेच पायदळाने वापरायच्या भाल्यांचे प्रकार होते. भारतात मराठा योद्धय़ांमध्ये भाल्याचा ‘विटा’ नावाचा प्रकार होता. त्यात भाल्याला दोरी बांधून फेकण्याची व भाला परत ओढून घेण्याची सोय होती. युरोपमध्ये अगदी पहिल्या महायुद्धापर्यंत भालाधारी घोडदळाची परंपरा कायम होती. ‘उलान’ नावाने ओळखले जाणारे पोलिश लान्सर्स प्रसिद्ध होते. नेपोलियननेही पोलंडच्या या भालाईत घोडदळाचे कौतुक केले होते.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com