उमाकांत देशपांडे

एका महापालिकेचा कर रद्द केल्यास राज्यभरातून दबाव येण्याची शक्यता

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई पाठोपाठ ठाणे महापालिका क्षेत्रातील ५०० चौ. फुटांपर्यंतच्या सदनिकांवर मालमत्ता कराची आकारणी न करण्याची घोषणा केली असली, तरी त्याची अंमलबजावणी करण्यावरून पेच निर्माण होणार आहे. एका महापालिकेसाठी ही सवलत दिल्यास राज्यभरातील सर्व महापालिकांमध्येही मालमत्ता कर रद्द करावा लागणार असून कोणताही आर्थिक बोजा सोसण्याची राज्य सरकारची तयारी नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

मुंबई महापालिका क्षेत्रात ५०० चौ. फुटांपर्यंत मालमत्ता करातून सूट देण्याची घोषणा ठाकरे यांनी केल्यावर त्यास मान्यता देण्यास राज्य सरकारने विलंब लावला होता. लोकसभा निवडणुकीआधी युती करताना शिवसेनेने त्यासाठी आग्रह धरल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा प्रस्ताव मान्य केला. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय श्रेय घेताना ठाकरे यांनी ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांनाही ५०० चौ. फुटांपर्यंत मालमत्ता करमाफी करण्याची घोषणा केली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात तसे वचन देऊनही अद्याप अंमलबजावणी न झाल्याने ठाकरे यांना घोषणेचा पुनरुच्चार करावा लागला. मात्र तरीही ही घोषणा निवडणुकीच्या हवेतच विरण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिकेत जर मालमत्ता करात सूट देण्यात आली, तर कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पुणे यासह सर्व महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता करातून दिलासा द्यावा लागेल. तशी मागणीही सुरू झाली असून मुंबई महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली असली, तरी अन्य महापालिकांचा आर्थिक डोलारा सांभाळला जाणे अवघड आहे. जकात, स्थानिक स्वराज्य संस्था कर रद्द झाल्यावर त्याची भरपाई राज्य सरकारमार्फत दिली जाते. त्यामुळे मालमत्ता कर रद्द केल्यास महापालिकांच्या उत्पन्नाला फटका बसेल. राज्य सरकारची आर्थिक बोजा स्वीकारण्याची कोणतीही तयारी नाही. परिणामी मालमत्ता करमाफी अवघड असल्याचे नगरविकास विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचीही ‘जुमले’बाजी

भाजपबरोबर शिवसेनाही निवडणुकांमध्ये जुमलेबाजी करण्यात मागे नसून ५०० चौ. फुटांपर्यंत मालमत्ता करमाफीची घोषणा हे त्याचेच उदाहरण आहे. ठाकरे यांची घोषणा फसवी असून तिची अंमलबजावणी करणे शक्य नाही. भाजप-शिवसेनेला ठाणे महापालिकेतील नागरिकांना दिलासा द्यायचा असेल, तर राज्यातील अन्य महापालिका क्षेत्रातील रहिवाशांबाबत त्यांचा

सापत्नभाव कशासाठी, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.