13 December 2019

News Flash

सरकार आले तरी टिकणे कठीण

फडणवीस, पाटील यांची टीका

(संग्रहित छायाचित्र)

तीन विचारांची तीन डोकी एकत्र येणे मुळात कठीण आहे. तरीही त्यांनी सरकार स्थापन केलेच तर ते किती दिवस चालेल याची खात्री नाही. त्यामुळे लोकांमध्ये जाऊ न काम करा, योग्य वेळी योग्य गोष्टी होतील, असा संदेश माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत दिला. सर्व २८८ मतदारसंघात मजबूत पक्षबांधणी करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

भाजपच्या आमदारांची बैठक मुंबई भाजपच्या दादर येथील ‘वसंतस्मृती’ या मुख्यालयात गुरुवारी सायंकाळी पार पडली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री आशीष शेलार, संघटनमंत्री विजय पुराणिक, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नेत्यांनी मार्गदर्शन केले. शहरी असो की ग्रामीण सर्व आमदारांनी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना भेटून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी काम करावे. मुंबईत फार काळ न घालवता आपापल्या मतदारसंघात जाऊ न लोकांची कामे करण्यासाठी, मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा, असा आदेश आमदारांना देण्यात आला. सरकार स्थापनेच्या भाजपच्या प्रयत्नांना शिवसेनेने कशी साथ दिली नाही, याची तपशीलवार माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिली.

‘तीन अंकी सत्तानाटय़ावर लक्ष’

राज्यात सध्या सत्तास्थापनेचे तीन अंकी नाटय़ सुरू असून भाजप त्यावर लक्ष ठेवून आहे, असे बैठकीनंतर आशीष शेलार यांनी सांगितले. राज्यातील ९० हजार मतदान केंद्रांवर संघटनात्मक निवडणुकीच्या माध्यमातून पक्ष मजबूत करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर शुक्रवारपासून ग्रामीण भागातील, तर शनिवारपासून शहरी भागातील आमदारांना राज्यात ठिकठिकाणी अवकाळीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटण्याचा, त्यांना मदत मिळावी यासाठी काम करण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली.

First Published on November 15, 2019 1:43 am

Web Title: difficult to survive even when the government arrives abn 97
Just Now!
X