दिघा येथील अनधिकृत बांधकामांवर पालिकेने हातोडा चालविल्यामुळे बेघर होण्याची भीती बाळगून असलेल्या येथील रहिवाशांनी गुरुवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णभुवन या निवासस्थानी भेट घेतली. कॅम्पाकोलातील रहिवाशांना दिलासा देणारे दिघामधील रहिवाशांबाबात भेदभाव का करतात, असा सवाल उपस्थित करत मनसे या रहिवाशांच्या पाठीशी उभी राहील, असे आश्वासन राज यांनी दिले.
दिघा येथे गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत साम्राज्य उभे राहिले. अनेक अनधिकृत इमारती व बांधकामे या अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या हितसंबंधातून उभ्या राहिल्यामुळे लोकांनीही आपल्याकडील पुंजी लावून या अनधिकृत जागा विकत घेतल्या. मात्र महापालिकेने या इमारतींवर हातोडा उगारला असून अनेक इमारती जमीनदोस्त केल्यामुळे उर्वरित इमारतींमधील हवालदिल रहिवाशांनी सेना-भाजपसह सर्वच पक्षांकडे धाव घेतली.
मात्र या इमारती वाचविण्यासाठी कोणताच पक्ष पुढे न आल्यामुळे अखेर दिघामधील रहिवाशांनी राज ठाकरे यांचे दार मदतीसाठी ठोठावले आहे. येथील रहिवाशांनी राज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असता या बांधकामांना जबाबदार असलेल्या अधिकारी व बिल्डरांवर कारवाई प्रथम करा अशी मागणी करत रहिवाशांच्या पाठीशी मनसे उभे राहील असे आश्वासन त्यांनी दिले.