नोकरभरतीच्या मुद्द्याबाबत गांभीर्याची   बँक कर्मचारी संघटनेकडून मागणी

औरंगाबाद : जनधन योजनेची स्थिती आणि व्याप्ती तसेच मुद्रा कर्ज योजनेसह बँकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये १२ राष्ट्रीयीकृत बँकेच्या अध्यक्षांची बैठक औरंगाबाद येथे  होणारआहे.

औरंगाबाद येथे झालेल्या औद्योगिक सुविधा अत्यंत प्रगत असल्याने उद्योजकांनी अर्ज केल्यानंतर कर्ज देणाऱ्या यंत्रणेलाही सारे माहीत असावे म्हणून बँकेच्या प्रमुखांचा डीएमआयसीमध्ये दौराही आयोजित करण्यात आला आहे. या बैठकीस रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. सकाळी पंजाब नॅशनल बँकेचे कार्यकारी संचालकाचे भाषण होणार असून विविध केंद्रीय योजनांवर चर्चा होणार आहे.

भागवत कराड यांच्या मार्गदर्शनानंतर जनधन या योजनेवर वित्तीय सेवा विभागाचे सहसंचालक भूषण कुमार सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर इंडियन बँक असोशिएशनच्या वतीने सादरीकरण करण्यात येणार आहे. दुपारी साडेबारा वाजता एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक ‘डिजिटल बँकिंग’वर सादरीकरण करणार आहेत. तर मुद्रा कर्जाबाबत निती आयोगाचे वरिष्ठ सल्लागारही बोलणार आहेत.

 

औरंगाबादच्या डीएमआयसीमध्ये सध्या बरेच उद्योग सुरू झाले आहेत. सरकारने डीएमआयसीच्या विकासासाठी तीन हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र अधिकाधिक उद्योगांनी औरंगाबादमध्ये गुंतवणूक वाढवावी यासाठी प्रथमच बँकांच्या प्रमुखांची बैठक औरंगाबाद येथे पार पडणार आहे. अशा उच्चस्तरीय बैठका सहसा फक्त राजधानीचे शहर आणि महानगरांमध्ये होत असतात. मात्र यंदा प्रथमच औरंगाबादसारख्या द्वितीय श्रेणीच्या शहरात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, असेही डॉ. कराड बैठकीच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट करताना म्हणाले.

बँकांनी अद्ययावत तंत्रज्ञान आणूनही बँकांच्या शाखांमधील गर्दी कमी होताना दिसत नाही. बँकिंग सेवांचा विस्फोट झाल्यामुळे करोना काळात देखील ही गर्दी वाढतच गेली. व्यवहार वाढत आहेत हे वास्तव लक्षात घेता सार्वजनिक क्षेत्रातील बँकातून त्वरित पुरेशी नोकरभरतीही केली जायला हवी, या मागणीकडे बँक कर्मचाऱ्यांची संघटना  ‘महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन’ने या बैठकीच्या निमित्ताने अर्थ राज्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

फडणवीस, दानवे यांचीही उपस्थिती

सायंकाळच्या सत्रात वित्तीय अधिकाऱ्यांच्या बैठकीबरोबरच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेही उपस्थितांना मार्गदर्शन होणार आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था औरंगाबाद येथे उभी करण्याचा मानस या पूर्वी डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केला होता. तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोसमही काहीसा बदलता येईल का, याची चाचपणी केली जाईल, असे ते म्हणाले होते. औरंगाबाद येथे झालेल्या औद्योगिक सुविधा अत्यंत प्रगत असल्याने उद्योजकांनी अर्ज केल्यानंतर, कर्ज देणाऱ्या यंत्रणेलाही सारे माहीत असावे म्हणून बैठकीसाठी येणाऱ्या बँकप्रमुखांचा डीएमआयसीमध्ये दौराही आयोजिण्यात आला आहे.