जागतिक समाजकारण आणि राजकारणातील डाव्या-उजव्या विचारसरणींच्या कडव्या प्रभावामुळे जग ढवळून जात असताना, जागतिक स्तरावर नेमस्त व मध्यममार्गी हिंदुत्वाच्या विचाराचे महत्त्व वेगळ्या अंगांनी रुजविण्याचा एक बिगरराजकीय प्रयत्न माध्यमविश्वात सुरू झाला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण, समाजकारण व अर्थशास्त्राचे विश्लेषक-पत्रकार शेषाद्री चारी यांच्या नेतृत्वाखाली  ‘हिंदू वर्ल्ड’ नावाची एक डिजिटल वाहिनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर माध्यमविश्वात दाखल झाली आहे.

गेल्या तीन-चार वर्षांपासून जगभर उजव्या विचारसरणीची चर्चा सुरू झाली आणि २०१४ मध्ये मोदींच्या विजयाने व पुढे ट्रम्पच्या विजयानंतर उजव्या राष्ट्रकारणाची चर्चा जगभर सुरू झाली. राष्ट्राभिमान, आर्थिक पातळीवर स्वदेशीचा नारा, संस्कृती, परंपरेचा अभिमान, हे करणारा तो उजव्या विचारसरणीचा मानला जाऊ लागला. ज्यांनी हे केलं नाही, किंबहुना हे संपविण्याचा प्रयत्न केला, ते डाव्या विचारसरणीचे मानले जाऊ लागले. रशिया, चीन यांनी ‘संस्कृती’ ही संकल्पनाच मानली नाही. अर्थकारणातदेखील जागतिक दृष्टिकोन ठेवला. जगातील कामगार हे कार्यक्षेत्र जाहीर केले. पण हे सारे त्यांनी त्यांच्या देशाच्या परिक्षेत्रातच केले. चीन जे काही करते, ते चीनसाठीच असते. ते भारताच्या कामगारासाठी नव्हे. उलट भारतातील बाजारपेठेवर आक्रमण करून येथील कामगाराच्या पोटावर चीनने पाय आणला आहे. म्हणजे चीनला जागतिक कामगारक्षेत्राशी खरे म्हणजे काहीच देणेघेणे नाही. प्रत्येक जण आपापल्या देशासाठीच तर काम करत असतील तर त्यांची धोरणेदेखील उजवीच म्हणायला हवीत. उलट हिंदूंएवढी जागतिक बंधुत्वाची भावना या जगात कोणीच जोपासलेली नाही. त्यामुळे ‘हिंदू वर्ल्ड’ ही संकल्पना घेऊन चॅनेल सुरू करावे असा विचार घेऊन ‘मध्यममार्गी हिंदुत्वा’ची संकल्पना या माध्यमाद्वारे रुजविण्याचा शेषाद्री चारी यांचा संकल्प आहे.

हिंदुत्व ही एक जीवनशैली आहे. देशातील ८५ टक्के समाज हा हिंदू आहे आणि भारत हा जगातील सर्वाधिक क्रयशक्ती असलेला देश असल्याने हिंदू समाज ही जगाची मोठी बाजारपेठ आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेला मदत करायची की, अमेरिकेला हातभार लावायचा हे ठरविण्याची ताकद भारताकडे आहे.

चीनच्या उत्पादनांना भारताची बाजारपेठ बंद केली, तर चीनची अर्थव्यवस्था ढेपाळून जाईल, ही देशाच्या ८५ टक्के लोकसंख्येची ताकद आहे. ही लोकसंख्या म्हणजे हिंदू समाजच जगाची अर्थव्यवस्था चालवत असेल, तर या समाजाला त्यांच्या शक्तीची ओळख करून देणे गरजेचे आहे. आम्ही त्यांच्याशी संवाद साधणार. आज मोबाइल फोन हेच संवादाचे, दळणवळणाचे आणि माहितीचे प्रभावी साधन असून बातम्या किंवा माहितीसाठीही डिजिटल माध्यमावर लोक सर्वाधिक अवलंबून राहू लागले आहेत. त्यामुळे या माध्यमावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले, असे शेषाद्री चारी म्हणाले.

जाहिरात विश्वातील आघाडीचे नाव असलेले सुजित नायर हे या वाहिनीचे प्रवर्तक आहेत. त्यांची ‘किसान कार्ट’ नावाची कंपनी मराठवाडय़ातील शेतकऱ्यांसोबत काम करते. त्यांचा माध्यमांशी जवळचा संबंध असल्याने, डिजिटल मीडिया हे भविष्याचे संवादाचे व माहितीचे साधन आहे, हे त्यांनी ओळखले व काम सुरू झाले. हिंदू वर्ल्ड हे नाव ठरले, उभारणी झाली आणि गुढीपाडव्याच्या दिवशी ही डिजिटल वाहिनी सुरू झाली. देशविदेशातील समाजजीवन, महत्त्वाच्या घडामोडी, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे पदर आणि भारतीय उपखंडातील त्याचे पडसाद, या पाश्र्वभूमीवर हिंदुत्व या संकल्पनेचा नव्याने विचार करण्याची वेळ आली असून, कडव्या किंवा टोकाच्या हिंदुत्वाऐवजी मध्यममार्गी हिंदुत्व हा विचार महत्त्वाचा ठरेल, असे शेषाद्री चारी मानतात.

हिंदूंच्या कल्याणाचा विचार करून त्यानुसार देशाची नीती आखली तर त्याचा लाभ अन्य धर्मीय समाजासही आपोआपच होणार असून त्यातूनच धार्मिक कटुतेच्या साऱ्या समस्या संपुष्टात येतील, असे ते म्हणतात. मोबाइलचा अधिकाधिक वापर करणाऱ्या, २० ते ४० वयोगटांतील युवकास या माध्यमाशी जोडण्याचे ‘हिंदू वर्ल्ड’चे उद्दिष्ट आहे.